पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचं आज पहाटे निधन झालं. आईच्या निधनानंतर पंतप्रधान मोदी गांधीनगरमध्ये दाखल झाले. पार्थिवाला यू. एन. मेहता रुग्णालयातून मोदींच्या गांधीनगरमधील घरी आणण्यात आलं होतं. मोदींनी घरीच आईच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. त्यानंतर रुग्णवाहिकेमधून पार्थिव स्मशानभूमीमध्ये अंतिमसंस्कारासाठी नेताना मोदींनी रुग्णवाहिकेमधूनच प्रवास केला. रुग्णवाहिकेपर्यंत पार्थिव नेताना मोदींनीच पार्थिवाला खांदा दिला. पंतप्रधान मोदींच्या मातोश्रींच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी रुग्णालयाबाहेर जमली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी गांधीनगरमधील घरी पोहोचले. आईच्या पार्थिवाचं दर्शन त्यांनी घेतलं. यावेळेस मोदींच्या गांधीनगरमधील घराबाहेर मोठी गर्दी जमा झाली होती.

मोदींनी आईच्या पार्थिवाला खांदा दिला.

नक्की वाचा >> मोदींना मातृशोक : राज्यपाल कोश्यारी हळहळले, सुप्रिया सुळे म्हणाल्या, “आम्ही सर्वजण मोदी कुटुंबाच्या…”

जून महिन्यामध्ये वयाची शंभरी ओलांडलेल्या हिराबेन यांना अस्वस्थ वाटू लागल्याने २८ डिसेंबर रोजी यूएन मेहता रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. पंतप्रधान मोदी त्याच दिवशी आईला भेटण्यासाठी अहमदाबाद गेले होते. आज रात्री साडेतीनच्या सुमारास हिराबेन मोदी यांनी अखेरचा श्वास घेतला.

“एक तेजस्वी शतक ईश्वराच्या चरणी विलीन झालं,” असं म्हणत पंतप्रधान मोदींनी आईच्या मृत्यूबद्दलची माहिती दिली आहे. हिराबेन यांचा हातामध्ये दिवा घेऊन असलेला फोटो शेअर करत, “आईमध्ये मी कायमच त्या त्रिमूर्तिचा अनूभव घेतला ज्यात एक तपस्व्याची यात्रा, निष्काम कर्मयोग्याचं प्रतीक आणि मूल्य दिसून आली,” असं मोदी म्हणाले आहेत.

नक्की वाचा >> Heeraben Modi Passes Away: नरेंद्र मोदींसारख्या व्यक्तीला जन्म देणं हे हिराबेन यांचं मोठं योगदान; संजय राऊतांची श्रद्धांजली

“मी तिला १०० व्या वाढदिवसानिमित्त भेटलो होतो तेव्हा तिने मला एक गोष्ट सांगितली होती ती म्हणजे, बुद्धीने काम करा आणि शुद्धपणे आयुष्य जगा,” असंही मोदींनी अन्य एका ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

यू. एन. मेहता रुग्णालयाने हिराबेन मोदी यांच्या मृत्यूची माहिती एका पत्रकाद्वारे जारी केली आहे. ३० डिसेंबर २०२२ रोजी यू. एन. मेहता रुग्णालयामध्ये हिराबेन मोदी यांचं उपचारादरम्यान निधन झालं. त्यांनी पहाटे ३ वाजून ३० मिनिटांनी अखेरच्या श्वास घेतला, असं रुग्णालयाने म्हटलं आहे.

हिराबेन मोदी यांचा जन्म १८ जून १९२३ रोजी झाला. याच वर्षी त्यांनी वयाची शंभरी ओलांडली होती. याच माहिन्याच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या आईची भेट घेतली होती. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील प्रचारानिमित्त मोदी गुजरातमध्ये होते तेव्हा त्यांनी आईची भेट घेतली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video prime minister narendra modi carries the mortal remains of his late mother heeraben modi scsg