Chennai Coromandel Express Accident : ओडिशातील बालासोरा येथे शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात आतापर्यंत २६१ जणांचे प्राण गेले असून ९०० हून अधिक जण जखमी आहेत. गेल्या दोन दशकातील ही सर्वांत भीषण घटना असल्याचंही म्हटलं जातंय. दरम्यान, याप्रकरणाची पाहणी करण्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी घटनास्थळी भेट दिली.
हेही वाचा >> …म्हणून तीन ट्रेन एकमेकांना धडकल्या, संयुक्त चौकशी समितीच्या अहवालातून कारण आले समोर
शुक्रवारी सायंकाळी ही घटना उजेडात आली तेव्हा ५० जणांचा मृत्यू झाला होता. परंतु बचावकार्य सुरू करताच मृतांची संख्या वाढत गेली. तसंच,जखमी प्रवाशांची संख्याही वाढली. आज (३ जून) या अपघातातील मृत आणि जखमींची अधिकृत आकडेवारी समोर आल्यानंतर अवघ्या देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात आली. तीन रुळांवरून धावणाऱ्या तीन रेल्वे एकाचवेळी एकमेकांना धडकल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, या सर्व प्रकरणाची माहिती घेण्याकरता पंतप्रधान घटनास्थळी दाखल झाले.
केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आतापर्यंत घडलेल्या घडामोडीची माहिती. तसंच, मोदींनी उपस्थित बचावकार्य पथकातील कर्मचाऱ्यांशीही संवाद साधला. घटनास्थळावर उपस्थित असलेल्या कॅबिनेट सचिव आणि आरोग्य मंत्र्यांसोबतही त्यांनी चर्चा केली. जखमींना सर्वतोपरी मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. “शोकग्रस्त कुटुंबांना गैरसोयीचा सामना करावा लागणार नाही आणि पीडितांना आवश्यक ती मदत मिळत राहावी यासाठी विशेष काळजी घेतली पाहिजे”, असेही ते म्हणाले.
घटनास्थळावर सर्व पाहणी केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी जखमींना भेटण्यासाठी थेट रुग्णालयात गेले. तेथे त्यांनी जखमी प्रवाशांची विचारपूस केली. त्यांनी प्रत्यक्षात जखमींसोबत संवाद साधला असून डॉक्टरांकडून त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती घेतली आहे.
मी निःशब्द आहे – पंतप्रधान नरेंद्र मोदी
“अपघाताला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार आहे. ओडिशा सरकारचे, प्रशासन अधिकाऱ्यांचे आभार मानतो. त्यांच्याकडे जे संसाधन होते त्यातून त्यांनी लोकांची मदत करण्याचा प्रयत्न केला. संकटाच्या काळात येथील नागरिकांनी रक्तदान शिबिर, बचावकार्यात मदत केली. या क्षेत्रातील तरुणांनी रात्रभर मेहनत केली. या क्षेत्रातील नागरिकांचे आदरपूर्वक नमन करतो. त्यांच्यामुळेच बचावकार्य तेजीने होऊ शकलं. बचावकार्य आणि वाहतूक पूर्ववत करण्याकरता सुविचारी प्रयत्न करण्यात येत आहेत. या दुःखद प्रसंगात मी घटनास्थळी जाऊन आलो आहे. रुग्णालयातील जखमींसोबत मी संवाद साधला आहे. माझ्याकडे शब्द नाहीत. पण आपण लवकरात लवकर या दुःखातून बाहेर पडू”, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डीडी सह्याद्रीशी बोलताना दिली.
का झाला अपघात?
निरिक्षकांनी केलेल्या संयुक्त तपासणीमधून सिग्नल यंत्रणेची चूक समोर आली आहे. याबाबतचा संयुक्त चौकशी अहवाल समोर आला असून इंडियन एक्स्प्रेसने त्यांसदर्भातील वृत्त दिले आहे. बहनगा बाजार स्टेशनवर मालगाडी लूप लाईनवर उभी होती. यादरम्यान चेन्नईहून हावडाला जाणारी १२८४१ कोरोमंडल एक्स्प्रेस बहनगा बाजार स्थानकावर पोहोचली. प्रत्येक स्थानकांवर ट्रेन पुढे जाण्याकरता एक लूप लाईन असते. बहनगा बाजार स्थानकाच्या अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर लूप लाईन आहेत. जेव्हा एखादी ट्रेन संबंधित स्थानकावरून पास केली जाते तेव्हा दुसऱ्या ट्रेनला स्थानकाच्या लूप लाईनवर उभं केलं जातं. बहनगा बाजार स्थानकावरही कोरोमंडल एक्स्प्रेस आणि यशवंतपूर हावडा एक्स्प्रेस पार करण्याकरता मालगाडीला कॉमन लूप लाईनवर उभं करण्यात आलं होतं. कोरोमंडल एक्स्प्रेस जलद गतीने मेन अप लाईनवरून जात होती. त्याचदरम्यान, डाऊन मार्गावरूनही यशवंत हावडा एक्स्प्रेस जात होती. कोरोमंडल ट्रेनला बहनगा स्थानकात सुरुवातीला सिग्नल देण्यात आला होता. त्यानंतर हा सिग्नल काढून टाकण्यात आला. त्यामुळे ही ट्रेन लूप लाईनच्या पुढे आली. ही ट्रेन जलद वेगाने धावत असल्याने या ट्रेनचे डबे रुळांवरून घसरले आणि मालगाडीला आपटले. त्यामुळे या मालगाडीचाही अपघात झाला.