Hudson River Helicoptor Crash: अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरातील हडसन नदीत गुरुवारी हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात तीन मुलांसह सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. न्यू यॉर्कचे महापौर एरिक अॅडम्स यांच्या मते, मृतांमध्ये एक पायलट आणि स्पेनहून आलेल्या एका कुटुंबाचा समावेश आहे. मृतांमध्ये सीमेन्स या जगप्रसिद्ध तंत्रज्ञान कंपनीचे स्पेनचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांचाही समावेश आहे. वृत्तसंस्था एएफपीनुसार, अपघातानंतर दोन पीडितांना तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले हो, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रूथ सोशलवर या दुःखद अपघाताबद्दल पोस्ट केली. पोस्टमधये ते म्हणाले, “हडसन नदीत भयानक हेलिकॉप्टर अपघात झाला आहे. पायलट, दोन प्रौढ आणि तीन मुले, आता आपल्यात नाहीत. अपघाताचा व्हिडिओ भयानक आहे. वाहतूक सचिव शॉन डफी आणि त्यांचे कर्मचारी या आपघाताची चौकशी करत आहेत. हा अपघात कसा झाला याबबात अधिकची माहिती ते देतील.”

मृतांमध्ये स्पेनमधील सीमेन्स कंपनीचे स्पेनमधील अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ऑगस्टिन एस्कोबार, त्यांची पत्नी आणि त्यांच्या तीन मुलांचा समावेश आहे. न्यू यॉर्क पोलीस विभागाच्या आयुक्त जेसिका टिश यांच्या मते, या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला होता. तर, दोन जखमींचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

ही घटना गुरुवारी दुपारी ३:१७ वाजता (अमेरिकेच्या स्थानिक वेळेनुसार) घडली. होबोकेनमधील पियर ए पार्क येथे न्यू जर्सीच्या किनाऱ्याजवळ हडसन नदीत हेलिकॉप्टर अपघात झाल्याची माहिती देणारे अनेक फोन पोलिसांना आले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पीडितांना नदीतून बाहेर काढले.

दरम्यान या अपघाताचे व्हिडिओ एक्सवर व्हायरल होत आहेत, ज्यात अपघाताचे क्षण कैद झाले आहेत. काही क्लिप्समध्ये हेलिकॉप्टर क्रॅश होण्यापूर्वी ते हवेत भरकटना दिसत आहे.

फ्लाईट रॅडर २४ नुसार, अपघातग्रस्त हेलिकॉप्टरचे नाव बेल २०६एल-४ लॉन्गरेंजर ४ असे आहे. ते २००४ मध्ये निर्माण करण्यात आले होते. नोंदींनुसार, २०१६ मध्ये त्याला उड्डाणाचे प्रमाणपत्र देण्यात आले होते.

प्रत्यक्षदर्शी काय म्हणाले?

या अपघाताच्या वेळी घटनास्थळी असलेले प्रत्यक्षदर्शी ब्रूस वॉल यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी हेलिकॉप्टर हवेत गिरक्या घेताना पाहिले. दुसरे प्रत्यक्षदर्शी, डॅनी हॉर्बियाक त्यांच्या जर्सी सिटीमधील घरी असताना त्यांना मोठा आवाज ऐकू आला. त्यांनी खिडकीतून बाहेर पाहिले तेव्हा हेलिकॉप्टरचे अनेक तुकडे होऊन ते नदीत पडले होते.