Delhi Annapurna Girls Hostel Fire : दिल्लीतील नॉलेज पार्क जे ब्लॉक परिसरातील अन्नपूर्णा गर्ल्स हॉस्टेलमध्ये २७ मार्च रोजी सायंकाळी उशिरा भीषण आग लागली. या आगीमुळे विद्यार्थिंनी प्रचंड भेदरल्या होत्या. एअर कंडिशनर कॉम्प्रेसरच्या स्फोटामुळे लागलेली ही आग वेगाने पसरली. यामुळे अनेक विद्यार्थिनींना जीव वाचवण्यासाठी इमारतीवरून उड्या माराव्या लागल्या.

या घटनेच्या व्हिडिओमध्ये दोन मुली बाल्कनीत अडकल्याचे दिसून येतंय. त्या पळून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. दोघांनीही खाली उतरण्याचा प्रयत्न केला आणि एअर कंडिशनिंग युनिटवर उभ्या राहिल्या. वसतिगृहाच्या बाहेरील भिंतीला स्टीलचे कुंपण होते, यामुळे बाहेर पडणे कठीण झाले. गोंधळात काही लोक वसतिगृहाच्या आवारात शिडी ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसले.

उतरण्याचा प्रयत्न करताना एका मुलीचा तोल गेला आणि ती वसतिगृहाच्या परिसरात पडली, तर दुसरी शिडी वापरून सुरक्षितपणे खाली उतरण्यात यशस्वी झाली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि सर्व विद्यार्थ्यांना बाहेर काढले.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अचानक लागलेल्या आगीमुळे गोंधळ उडाला आणि वसतिगृहाच्या परिसरात आरडाओरडा सुरू झाला.