काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी २२ मे च्या रात्री दिल्लीपासून चंडीगडपर्यंत ट्रकमधून प्रवास केला. यावेळी त्यांनी ट्रकचालकांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस पक्षातर्फे २३ मे रोजी यासंबंधी माहिती देण्यात आली. राहुल गांधी ट्रकमध्ये चढताना आणि बसलेले असताना त्यांचे फोटो आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणात समाजमाध्यमांवर पसरले होते. या प्रवासात राहुल गांधींनी ट्रकचालकांशी काय संवाद साधला यासंदर्भातील व्हिडीओ आता त्यांनी जारी केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिल्लीहून शिमल्याला जात असताना राहुल गांधी पंजाब आणि हरियाणातील ट्रक चालकांच्या गटाला मुरथल येथे भेटले. ट्रक चालक प्रेम राजपूतच्या विनंतीवरून राहुल गांधी यांनी त्याच्या ट्रकमध्ये चंदीगडचा प्रवास पूर्ण केला. राहुल गांधी म्हणाले, “हा अतिशय मनोरंजक ६ तासांचा ट्रक प्रवास होता, ज्या दरम्यान मला ट्रक चालकांच्या जीवनाबद्दल बरेच काही शिकायला मिळाले.”

व्हिडीओमध्ये राहुल गांधी जेवताना, चहा पिताना, लोकांना भेटताना आणि ट्रक चालकांशी बोलत असल्याचे दृश्य दिसत आहे. मुरथल येथील एका ढाब्यावर राहुल गांधी ट्रक चालकांसोबत बसले आहेत. या व्यवसायात कसे आले, त्यांनी हा व्यवसाय कसा सुरू केला, एका महिन्यात कितीवेळा गाडी चालवतात, ते किती वेळ गाडी चालवतात आणि त्यांना किती सुट्टी मिळते? याशिवाय अनेक प्रश्न राहुल गांधी यांनी यावेळी विचारले.

“सरकारने तुमच्यासाठी काय केलं पाहिजे?”, असा महत्त्वाचा प्रश्न राहुल गांधींनी ट्रक चालकांना विचारला. “ट्रक चालकांना १२ तासांच्या शिफ्टमध्ये काम करावं लागतं. त्यामुळे सरकारने कामाच्यावेळेबाबत नियम केले पाहिजेत. कारण, चालकांना ओव्हरटाईम मिळत नाही”, असं एका ट्रकचालकाने सांगितलं. “चोरी किंवा मालाचे नुकसान झाल्यास प्रकरण चालकालाच जबाबदार धरलं जातं”, अशी खंतही यावेळी चालकांनी बोलून दाखवली.

दरम्यान, एक चालक चंदीगडच्या दिशेने जात होता. त्या चालकाने राहुल गांधींना त्यांच्यासोबत येण्याची विनंती केली. त्यावेळी राहुल गांधी यांनी त्यांची विनंती तत्काळ मान्य करत त्यांच्या ट्रकमधून प्रवास सुरू केला. प्रवासादरम्यानही राहुल गांधींनी चालकाशी संवाद साधला.

गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी जनतेशी संवाद साधत आहेत. भारत जोडो यात्रेचा परिणाम कर्नाटक निवडणुकीत जाणवल्यानंतर त्यांनी स्थानिकांशी संवाद साधायला सुरुवात केली आहे. आगामी काळात मध्य प्रदेशमध्ये निवडणुका लागणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर त्यांनी तयारी सुरू केली असल्याचं म्हटलं जातंय.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video what should the government do for you truck drivers emotional response to rahul gandhis question sgk