Women Body Builder Pose In Front Of Hanuman: महिलांच्या बॉडी-बिल्डिंग स्पर्धेत भगवान हनुमानाचा कथित अपमान केल्यावरून काँग्रेस विरुद्ध भाजपा वाद सुरू झाला आहे. यावरूनच काँग्रेसच्या काही अधिकार्यांनी सोमवारी मध्य प्रदेशातील रतलाम येथे भारतीय जनता पक्षाने आयोजित केलेल्या शरीरसौष्ठव स्पर्धेच्या ठिकाणी गंगाजल शिंपडले. कार्यक्रमाच्या आयोजन समितीमध्ये शहराचे भाजपाचे महापौर प्रल्हाद पटेल आणि आमदार चैतन्य कश्यप *यांचीसुद्धा नावे होती.
पीटीआयने कार्यकर्त्यांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, ४ व ५ मार्च रोजी झालेल्या १३व्या मिस्टर ज्युनियर बॉडीबिल्डिंग स्पर्धेदरम्यान महिला शरीरसौष्ठवपटूंना हनुमानाच्या पुतळ्यासमोर उभे केले होते. यानंतर स्थानिक काँग्रेस नेत्यांनी गंगाजल शिंपडून आणि हनुमान चालिसाचे पठण करून या ठिकाणाचे ‘शुद्धीकरण’ केले.
सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या या कार्यक्रमाच्या व्हीडिओमध्ये महिला बॉडीबिल्डर्स हनुमानाच्या मूर्तीसमोर पोज देताना दिसत आहेत, यावरून माजी महापौर आणि काँग्रेस नेते पारस सकलेचा यांनी विद्यमान महापौर प्रल्हाद पटेल व आमदार चैतन्य कश्यप यांच्यावर अभद्र वर्तणुकीचा आरोप केला आहे. जिल्हा युवक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मयंक जाट यांनी पीटीआयच्या वृत्तात नमूद केल्याप्रमाणे भगवान हनुमान दोषींना शिक्षा करतील असे म्हटले आहे.
काँग्रेसचे प्रमुख कमलनाथ यांचे माध्यम सल्लागार पीयूष बाबेले यांनी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम ‘हिंदूंचा आणि भगवान हनुमानाचा अनादर करणारा’ असल्याचे सांगत, माफी मागावी अशी मागणी केली आहे.
दरम्यान, यावरून भाजपाचे प्रवक्ते हितेश बाजपेयी यांनी प्रत्युत्तर देत म्हटले की, “काँग्रेसला महिलांची खेळात प्रगती होताना बघवत नाही. कार्यक्रम आयोजकांनी काँग्रेस नेत्यांवर कारवाई करण्याची विनंती करणारे निवेदन पोलिसांकडे दाखल केले आहे. काँग्रेसवाले महिलांना कुस्ती, जिम्नॅस्टिक्स किंवा पोहण्याच्या स्पर्धांमध्ये पाहू इच्छित नाहीत, कारण त्यामुळे त्यांच्यातील राक्षस जागा होतो. खेळाच्या मैदानावरील महिलांकडे त्यांची वाईट नजर होती. त्यांना लाज वाटत नाही का?”