गंभीर गैरव्यवहार विभागाचे मत
आयसीआयसीआय बँकेने व्हिडिओकॉन समूहाला दिलेल्या विस्तारित कर्ज प्रकरणाची चौकशी करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती गंभीर गैरव्यवहार तपास कार्यालयाच्या (एसएफआयओ) मुंबई शाखेने दिल्लीतील मुख्यालयाकडे केली आहे. कार्यालयाच्या दिल्लीस्थित मुख्यालयाकडून मुंबईतील यंत्रणेला याबाबत हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे. या व्यवहाराची रक्कम मोठी असून, त्यात जनतेचा पैसा अडकला असल्याचे कारण ‘एसएफआयओ’च्या मुंबई शाखेने दिले आहे.
व्हिडिओकॉन समूहाला आयसीआयसीआय बँकेने ३२५० कोटी रुपयांचे कर्ज दिल्याचे प्रकरण ‘इंडियन एक्स्प्रेस’ने २९ मार्च रोजी उघड केले होते. व्हिडिओकॉन समूह व त्याच्या प्रवर्तकांना आयसीआयसीआय बँकेने दिलेल्या कर्जाबाबतची तक्रार ‘एसएफआयओ’ कार्यालयाच्या मुंबई शाखेला यंदाच्या फेब्रुवारीमध्येच प्राप्त झाली होती. तक्रारीत आर्थिक गैरव्यवहारांची साशंकता व्यक्त करण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले. व्हिडिओकॉन समूहाने २००८मध्ये दीपक कोचर यांच्या सहकार्याने नू-पॉवर कंपनी स्थापली. दीपक कोचर हे आयसीआयसीआय बँकेच्या प्रमुख चंदा कोचर यांचे पती. आयसीआयसीआयकडून कर्जपुरवठा झाल्याने दुहेरी हितसंबंधांचा मुद्दा उपस्थित होतो हा प्रमुख आक्षेप आहे. पुढे व्हिडिओकॉन समूहाला कर्जाच्या बहुतेक हिश्श्याची परतफेड करता आलेली नाही, त्यामुळे प्रकरण अधिक गंभीर बनले आहे.
सध्याचे संशयास्पद वातावरण पाहता त्याच्या चौकशीची आवश्यकता मांडली गेली आहे. कोटय़वधी रकमेच्या या प्रकरणात गुंतवणूक, ग्राहकांचा पैसा अडकला आहे, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.