पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केलेलं भाषण प्रक्षोभक आणि बेजबाबदारपणाचं होतं. संपूर्ण जगाला पाकिस्तानात जाऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला पाहिजे. पाकिस्तान केवळ मानवाधिकाराचा कळवळा असल्याचं दाखवत आहे. पाकिस्तानात अल्पसंख्यांवरही अत्याचार होत आहेत. दहशतवाद्यांची फॅक्ट्री चालवणाऱ्यांकडून कोणत्याही सर्टिफिकेटची गरज नाही, अशा कठोर शब्दात संयुक्त राष्ट्रातील भारताच्या प्रथम सचिव विदिशा मैत्रा यांनी उत्तर दिलं.

पाकिस्तान दहशतवादावर जोर देत आहे, तर भारत विकासावर जोर देत आहे. दहशतवादावर इम्रान खान खोटे दावे केले. पाकिस्तान आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांना पेन्शन देत आहे. दहशतवाद्यांची फॅक्ट्री चालवणाऱ्यांकडून कोणत्याही सर्टिफिकेटची गरज नसल्याचे मैत्रा यांनी स्पष्ट केलं. पाकिस्तानने उघडउघड ओसामा बिन लादेनचं समर्थन केलं. यापूर्वी पाकिस्तानातील अल्पसंख्यांकांची संख्या 27 टक्के होतं. परंतु आता ते 3 टक्क्यांवर आली आहे. पाकिस्तानात अल्पसंख्यांकांवर अत्याचार होत आहेत. यापूर्वीही पाकिस्तानात अल्पसंख्यांकावर अत्याचार होत होते. तिच परिस्थितीही अद्यापही कायम आहे. पाकिस्तानने संयुक्त राष्ट्राच्या मंचाचा दुरूपयोग केला, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं.

काश्मीरबाबत खोटे दावे करत इम्रान खान यांनी भारताला अणू हल्ल्याची धमकी दिली होती. “जर आम्ही अणूहल्ल्याच्या दिशेने पुढे सरसावलो तर संयुक्त राष्ट्र याला जबाबदार असेल. 1945 मध्ये यासाठीच संयुक्त राष्ट्राची स्थापना झाली होती. त्यांनी हे थांबवायला हवं. दोन्ही देशांमध्ये युद्ध झालं तर त्यानंतर काहीही होऊ शकतं. आपल्या शेजारी देशाच्या तुलनेत तुमचा देश लहान असेल तर त्याच्यासमोर कोणता पर्याय असेल? शरणागती पत्करायची की लढायचं. पण आम्ही लढण्याचा पर्याय स्वीकारू” असं इम्रान खान म्हणाले होते.