देशातील अनेक बँकांचे ९ हजार कोटींहून अधिक रकमेचे कर्ज बुडवणारे उद्योगपती व युनायटेड ब्रुअरीजचे माजी अध्यक्ष विजय मल्या यांचा पासपोर्ट रद्द करण्यात आला आहे. मल्या यांची किंगफिशर विमान कंपनीही यापूर्वीच बंद पडली आहे. आयडीबीआय बँकेचे ९०० कोटींचे कर्ज मल्या यांनी बुडवले आहे.

परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी सांगितले की,  सक्तवसुली संचालनालयाने पाठवलेल्या नोटिशीवर मल्या यांनी दिलेल्या उत्तराचा  विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. किमान तीन वेळा समन्स पाठवूनही मल्या हे सक्तवसुली संचालनालयासमोर  उपस्थित राहिले नव्हते. माझ्या वतीने वकील चौकशीत सहकार्य करतील असे मल्या यांनी सांगितले होते. मल्या यांच्यावर मुंबई येथील विशेष न्यायाधीशांनी पीएमएलए कायदा २००२ अनुसार अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे.

मंत्रालयाने मल्या यांना देशात आणण्यासाठी कायदा तज्ञांशी सल्लामसलत सुरू केली आहे. बँकांचे कर्ज बुडवल्याचा आरोप मल्या यांच्यावर आहे. मल्या यांच्याकडे राजनैतिक पासपोर्ट आहे. ते सध्या ब्रिटनमध्ये असून २ मार्चला तेथे गेले आहेत. त्यांनी सक्तवसुली संचालनालयासमोर उपस्थित राहण्यास नकार दिला असल्याने त्याचा पासपोर्ट रद्द होणार हे जवळपास निश्चित होते, त्यानंतर १५ एप्रिलला सक्तवसुली संचालनालयाने दिलेल्या प्रस्तावानुसार मल्या यांचा पासपोर्ट निलंबित करण्यात आला होता आता तो रद्द करण्यात आला आहे.

 

Story img Loader