बँकांकडून घेतलेले कोटय़वधींचे कर्ज बुडवून परदेशात पळून गेलेला उद्योगपती विजय मल्या याने सोमवारी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

मल्याने त्याच्या किंगफिशर एअरलाइन्ससाठी विविध बँकांकडून घेतलेले सुमारे ९००० कोटी रुपयांचे कर्ज फेडलेले नाही. त्याबाबत कारवई सुरू झाल्यावर तो ब्रिटनला पळून गेल्याचे वृत्त होते. या प्रकरणानंतर गेल्या आठवडय़ात राज्यसभेच्या नैतिकताविषयक समितीने (एथिक्स कमिटी) मल्याची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र केवळ उपचार म्हणून त्याला नियमाप्रमाणे आपले म्हणणे मांडण्यासाठी एक आठवडय़ाचा वेळ दिला होता.

समितीची पुढील बैठक ३ मे रोजी होत असून त्यात अंतिम निर्णय घेतला जाईल, असे समितीचे अध्यक्ष आणि काँग्रेस नेते करण सिंग यांनी सांगितले. दरम्यान, सोमवारी मल्याने राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्याच्या सदस्यत्वाची मुदत ३० जून २०१६ रोजी संपणार होती.

Story img Loader