भारतातील बँकांचे ९ हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून परदेशात पसार झालेला मद्यसम्राट विजय मल्ल्याच्या लंडनमधील हवेलीवर टांच येण्याची चिन्हे असतानाच भारतातही मल्ल्याला आणखी एक हादरा बसला आहे. विजय मल्ल्याकडील दोन हेलिकॉप्टर आयकर विभागाने विक्रीस काढली असून या हेलिकॉप्टर्सची किंमत आठ कोटी रुपये इतकी आहे.

कर्जबुडव्या विजय मल्ल्याच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे नाहीत. काही दिवसांपूर्वी यूबीएस एजी या स्विस बँकेने विजय मल्ल्याविरोधात ब्रिटनच्या हायकोर्टात दावा दाखल केला होता. कर्ज न फेडल्याने यूबीएस बँकेने मल्ल्याच्या लंडनमधील हवेलीचा ताबा मिळावा, यासाठी हा दावा दाखल केला. यानंतर आता देशातील आयकर विभागानेही विजय मल्ल्याविरोधात पावले उचलली आहेत. आयकर विभागाने मंगळवारी वृत्तपत्रात जाहिरात दिली असून विजय मल्ल्याकडील दोन हेलिकॉप्टर्सचा लिलाव केला जाणार आहे.

आयकर विभागाच्या जाहिरातीनुसार चर्चगेटमधील एसबीआयकॅप ट्रस्टी कंपनीतील कार्यालयात ही लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. लिलावात सहभागी होणाऱ्यांना भारतीय चलनात बोली लावावी लागणार आहे. ९ नोव्हेंबर रोजी ही लिलाव प्रक्रिया होईल. तर ३ नोव्हेंबर रोजी इच्छुकांना जुहू विमानतळावर हेलिकॉप्टर्सची पाहणी करता येणार आहे.

२००८ मधील हेलिकॉप्टर्स
विजय मल्ल्याच्या किंगफिशर एअरलाइन्स लिमिटेडकडे एअरबस हेलिकॉप्टर्स एच१५५ बी १या श्रेणीतील दोन हेलिकॉप्टर्स आहेत. २००८ मध्ये या हेलिकॉप्टर्सची निर्मिती करण्यात आली आहे. सध्या ही दोन्ही हेलिकॉप्टर्स जुहू विमानतळावरील मेस्को हँगर्समध्ये पार्क करुन ठेवण्यात आली आहे.

Story img Loader