बँकांची फसवणूक करुन भारतातून फरार झालेल्या विजय मल्ल्याच्या वकिलाने सुप्रीम कोर्टाकडे आपल्याला या प्रकरणातून मुक्त करावं अशी विनंती केली आहे. विजय मल्याने भारतातील विविध १७ बँकांचं ९००० कोटी रुपयांहून अधिक कर्ज थकवलं आहे. विजय मल्ल्या सध्या ब्रिटनमध्ये असून त्याच्या प्रत्यार्पणासाठीही भारताकडून प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान विजय मल्ल्या आपल्या सापडत नसून, कोणत्याही प्रकारे संभाषणाला उत्तर देत नसल्याचं त्याच्या वकिलांनी म्हटलं आहे.
ई सी अग्रवाल हे सुप्रीम कोर्टात विजय मल्ल्याच्या वतीने बाजू मांडत होते. न्याममूर्ती डी वाय चंद्रचूड आणि हिमा कोहली यांच्या खंडपीठासमोर त्यांनी आपल्याला या प्रकरणातून मुक्त करण्याची मागणी केली आहे. “माझ्या माहितीप्रमाणे विजय मल्ल्या युकेमध्ये वास्तव्यास आहे. पण तो आता माझ्याशी संवाद साधत नाही आहे. माझ्याकडे फक्त त्याचा ई-मेल आहे. तो सापडत नसताना आणि भारतातही कुठे समोर येत असताना मला त्याचं प्रतिनिधित्व करण्यापासून मुक्त करावं,” अशी विनंती त्यांनी केली.
विजय माल्या दिवाळखोर; लंडन हायकोर्टाचा निकाल
स्टेट बँक ऑफ इंडियासोबतच्या आर्थिक वादासंबंधी मल्ल्याने दाखल केलेल्या याचिकांवर कोर्टात सुनावणी सुरू होती. दरम्यान खंडपीठाने त्यांना परवानगी दिली असून संबंधित प्रक्रियेचं पालन करण्याची सूचना केली आहे. तसंच कोर्ट रजिस्ट्रीला त्याला ई-मेल आयडी आणि सध्याचा निवासी पत्ता यीचा माहिती देण्यास सांगितलं. याप्रकरणी जानेवारीत पुढील सुनावणी होणार आहे.
वर्षाच्या सुरुवातीला सुप्रीम कोर्टाने मल्ल्याला न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल चार महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. यावेळी कोर्टाने मल्ल्या भारतात आणताना सुरक्षेसंबंधी पावलं उचलण्याचे निर्देशही सरकारी अधिकाऱ्यांना दिले होते. पण मल्ल्या अद्याप भारतात आलेला नाही आणि प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेला सामोरा जात आहे.
युके उच्च न्यायालयाने एप्रिल २०२० मध्ये मल्ल्याच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिली होती. पण गेल्या अडीच वर्षांपासून हे प्रत्यार्पण रखडलं आहे.