भारतीय बँकाचे तब्बल नऊ हजार कोटींचे कर्ज बुडवून परदेशात पळून गेलेल्या विजय मल्ल्या यांनी संबंधित बँकांच्या प्रमुखांसमोर प्रकरण मिटविण्याचा प्रस्ताव ठेवल्याची माहिती उघड झाली आहे. मल्ल्यांनी दोन हजार कोटींच्या मोबदल्यात हे प्रकरण मिटवा, असा प्रस्ताव बँकासमोर ठेवला होता. मात्र, ही रक्कम म्हणजे मल्ल्यांच्या डोक्यावर असलेल्या कर्जाच्या केवळ एक चतुर्थांश आहे. विजय मल्ल्यांनी आम्हाला दोन हजार कोटींमध्ये तडजोड करण्याचा प्रस्ताव दिला असल्याचे संबंधित बँकातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘द फायनान्शियल एक्स्प्रेस’ वृत्तपत्राला सांगितले. मात्र, एसबीआयच्या नेतृत्त्वाखालील बँकाच्या या संघटनेने मल्ल्यांचा हा प्रस्ताव नाकारला. आम्ही इतकी कमी रक्कम स्विकारू शकत नसल्यामुळे हा प्रस्ताव नाकारल्याचे बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या बँका मल्ल्या यांना दिलेल्या कर्जाची रक्कम वसूल करण्याचे प्रयत्न करत आहेत. याशिवाय, अंमलबजावणी संचलनालयानेही (ईडी) मल्ल्या यांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. सरकारनेही मल्ल्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी आस्थापने किंवा कंपन्या जर कर्जाची परतफेड करीत नसतील तर आस्थापना किंवा कंपनीचे प्रवर्तक संचालक यांच्या जामीनदारांच्या मालमत्ता विकून त्यातून बँकांनी कर्ज वसुली करण्याचा आदेश दिला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा