पंजाब नॅशनल बँकेला १३ हजार ५०० कोटींचा चुना लावून पसार झालेल्या मेहुल चोक्सीला पुन्हा भारतात आणण्यासाठी सध्या सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. डोमिनिकामध्ये अटकेत असलेल्या मेहुल चोक्सी प्रकरणावर सध्या तेथील कोर्टात सुनावणी सुरु असून यावेळी त्याचं भारतात प्रत्यार्पण व्हावं यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान मेहुल चोक्सीच्या निमित्ताने सध्या भारतातून पसार झालेल्या नीरव मोदी, विजय मल्ल्या यांचीही चर्चा सुरु आहे. यादरम्यान पीएमएलए कोर्टाने कर्ज वसूल करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया आणि इतर बँकांना विजय मल्ल्याची संपत्ती विकण्यास परवानगी दिली आहे. ही संपत्ती ईडीने जप्त केली असून १ जन रोजी हा निकाल दिला आहे. या सर्व घडामोडींदरम्यान होणाऱ्या चर्चेवर विजय मल्ल्याने नाराजी जाहीर केली आहे.
आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप असलेल्या मद्यसम्राट विजय मल्ल्याने प्रसारमाध्यमांमध्ये फसवणूक करणारा असा उल्लेख होत असल्याने नाराजी जाहीर केली आहे. विजय मल्ल्याने ट्वीट करत म्हटलं आहे की, “टीव्ही पाहत असून वारंवार माझा उल्लेख फसवणूक करणारा असा केला जात आहे. किंगफिशर एअरलाइनवर असलेल्या कर्जापेक्षा जास्त मालमत्ता ईडीने जोडली आहे तसंच अनेक वेळा मी १०० टक्के रक्कम परत करण्यासाठी ऑफर दिली आहे याचा कोणीच विचार करत नाही का? कुठे आहे फसवणूक?”.
Have been watching TV and the repeated mention of my name as a cheat and fraudster. Does nobody consider that my assets far in excess of Kingfisher Airline borrowings have been attached by ED and the several of my settlement offers to repay 100% ? Where is the cheating or fraud?
— Vijay Mallya (@TheVijayMallya) June 3, 2021
आणखी वाचा- “मेहुल चोक्सीचं भारतात प्रत्यार्पण करावं लागेल”, डोमिनिका सरकारचा कोर्टात युक्तिवाद
भारतातील विविध १७ बँकांचे ९००० कोटी रुपयांहून अधिक कर्ज थकविणाऱ्या विजय मल्ल्या भारतातून फरार आहे. विजय मल्ल्या सध्या ब्रिटनमध्ये असून त्याच्या प्रत्यार्पणासाठीही भारताकडून प्रयत्न सुरु आहेत.