मद्यसम्राट विजय मल्या यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा दिलेला राजीनामा मंगळवारी सभापती हमीद अन्सारी यांनी प्रक्रियात्मक कारणास्तव फेटाळून लावला. त्यामुळे मल्या यांची राज्यसभेतून हकालपट्टी केली जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्यसभेचे सभापती हमीद अन्सारी यांनी मल्या यांचा राजीनामा स्वीकारला नाही. मल्या यांचे राजीनामापत्र प्रक्रियात्मक पद्धतीत बसणारे नाही आणि त्यावर मूळ स्वरूपातील स्वाक्षरीही नाही, असे राज्यसभेच्या महासचिवांनी मल्या यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. राज्यसभेच्या नियम २१३ नुसार राजीनामा ऐच्छिक आणि विश्वासार्ह हवा, असे अन्सारी यांचे विशेष अधिकारी गुरदीपसिंग सप्पल यांनी महासचिवांच्या पत्राचा हवाला देऊन ट्वीट केले आहे. ब्रिटनमधून मल्या यांनी स्कॅन केलेली राजीनामा प्रत अन्सारी यांना पाठविली. नाव आणि कीर्ती मलिन होऊ नये आणि हकालपट्टी टाळली जावी यासाठी त्यांनी राजीनामा प्रत पाठविली होती. योग्य न्याय मिळणार नाही, त्यामुळे राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे मल्या यांनी म्हटले आहे.
विजय मल्या यांचा राजीनामा फेटाळला
राज्यसभेचे सभापती हमीद अन्सारी यांनी मल्या यांचा राजीनामा स्वीकारला नाही.
First published on: 04-05-2016 at 06:38 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vijay mallyas resignation rejected