घरात लग्नाची लगबग सुरु होती, लग्न पंधरा दिवसांवर आल्यामुळे घरातला प्रत्येक सदस्य कुठल्या ना कुठल्या तयारीमध्ये व्यस्त होता. घर आनंद, उत्साहाने भरलेले असताना रविवारी फोन खणखणला आणि एका क्षणात तो आनंद दु:खामध्ये बदलून गेला. संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. घरातला कर्ता मुलगा सीमेवर पाकिस्तानशी दोन हात करताना शहीद झाला होता.
रविवारी जम्मू-काश्मीरच्या अखनूर सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात दोन जवान शहीद झाले. या शहीद जवानांपैकी विजय पांडे यांचे २० जूनला लग्न होणार होते. उत्तर प्रदेशच्या फतेहपूर येथील विजय पांडे यांच्या घरी त्यांच्या लग्नाची तयारी सुरु होती. सोमवारी विजय पांडे यांचे तिरंग्यामध्ये लपेटलले पार्थिव घरी पोहोचले त्यावेळी घरातल्या सदस्यांनी एकच हंबरडा फोडला आणि मन सून्न झाले.
ज्या घरात लग्नाचे सनई-चौघडे वाजणार होते तिथे दु:ख भरुन राहिले होते. विजय पांडे यांच्या लग्नाची जवळपास सर्व तयारी झाली होती. लग्नाच्या निमंत्रण पत्रिकाही छापल्या गेल्या होत्या. विजय पांडे यांना आज अखेरचा निरोप देण्यासाठी त्याच्या फतेहपूर येथील मूळगावी मोठया संख्येने लोक जमले होते. सर्वांच्याच मनात पाकिस्तानबद्दल एक संतापाची भावना होती. कुठल्याही परिस्थितीत विजय पांडे यांचे बलिदान वाया जाऊ नये अशीच प्रत्येकाच्या मनात भावना होती.