Pahalgam Terror Attack Vijay Wadettiwar Reacts : काश्मीरच्या पहलगाममधील बैसरन येथे २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला, ज्यामध्ये २६ जण ठार झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला आहे. दरम्यान, या हल्ल्यातून बचावलेल्या एका महिलेने प्रसारमाध्यमांसमोर सांगितलं की एकूण चार दहशतवाद्यांनी आमच्यावर हल्ला केला होता. त्यांनी पर्यटकांना आधी त्यांचा धर्म विचारला त्यानंतर गोळीबार केला. तुम्ही हिंदू आहात का? असं विचारून जे हिंदू होते त्यांच्यावरच गोळ्या झाडल्याचं या महिलेने सांगितलं. यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.
“दहशतवादी हल्ला करतेवेळी लोकांशी बोलत बसतात का? धर्म विचारत बसतात का?” असे प्रश्न काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केले आहेत. तसेच ते म्हणाले की “काही पर्यटक सांगत आहेत की दहशतवाद्यांनी गोळ्या झाडण्यापूर्वी लोकांना धर्म विचारला तर काहीजण सांगतायत की असं काही घडलंच नाही.”
“हल्ला होईपर्यंत गुप्तचर यंत्रणा व सरकार काय करत होतं?”
काँग्रेस आमदार म्हणाले, “हे लोक (सत्ताधारी) नेहमी भारत-पाकिस्तान असा जप करत असतात. त्यांनी आता सांगावं की या हल्ल्याची जबाबदारी कोणाची? हा हल्ला म्हणजे सरकारचं अपयश असल्याचं सरकारने स्वीकारावं. पहलगाममध्ये जे काही घडलं, २७ जण त्या हल्ल्यात मारले गेले. पहलगाममध्ये, काश्मीर खोऱ्यात सुरक्षा व्यवस्था का नव्हती? तिथली सुरक्षा व्यवस्था का हटवली? अतिरेकी देशाची सीमा ओलांडून २०० किलोमीटरपर्यंत आत घुसले आणि आपल्या लोकांना त्यांनी मारलं. हे सगळं होत असताना मोदी सरकार काय करत होतं? त्यांची गुप्तचर यंत्रणा काय करत होती?”
दहशतवाद्याचा धर्म किंवा त्याची कुठलीही जात नसते : वडेट्टीवार
विजय वडेट्टीवार म्हणाले, “पहलगाम हल्ला हे सरकारचं अपयश नाही का? त्यावर या सरकारमधील लोक काहीच बोलत नाहीत. हे लोक काय बोलतात तर त्यांनी (दहशतवाद्यांनी) धर्म विचारून पर्यटकांना मारलं. अरे मुळात यासाठी वेळ असतो का? प्रत्येकाच्या जवळ जाऊन, त्याच्या कानात बोलायला, त्याचा धर्म विचारायला वेळ असतो का? यावरून बरेच वाद आहेत. काही लोक म्हणाले, दहशतवाद्यांनी धर्म विचारला, तर काहीजण म्हणत आहेत की असं काही घडलं नाही. मुळात दहशतवाद्याचा धर्म किंवा त्याची कुठलीही जात नसते.”
“सरकार लोकांना भरकटवतंय”
सरकारने मूळ मुद्द्यावरून लोकांना भरकटवू नये, असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. तसेच ते म्हणाले, “या दहशतवाद्यांना, कटात सामील लोकांना पकडून त्यांच्यावर कारवाई करा, हीच देशातील सर्व नागरिकांची भावना आहे. कारण हा केवळ पहलगाममधील एका पर्यटनस्थळावरील हल्ला नव्हता. तो संपूर्ण देशावरील हल्ला होता. त्यामुळे सरकारने मूळ मुद्द्यावरून लोकांना भरकटवू नये. लोकांना भरकटवणं चुकीचं आहे.”