पीटीआय, नवी दिल्ली

तीन वेळा नवडून आलेले भाजप आमदार विजेंद्र गुप्ता यांची सोमवारी दिल्ली विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्षपदी निवड करण्यात आली. गुप्ता रोहिणी मतदारसंघातील आमदार आहेत. गुप्ता यांच्या निवडीनंतर सत्ताधारी आणि विरोधकांनी केलेल्या प्रचंड घोषणाबाजीमुळे सभागृहाचे कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब करावे लागले. यावेळी आम आदमी पक्षाने (आप) भाजप ‘दलित-शीखविरोधी’ असल्याची टीका केली.

अध्यक्षपद निवडणुकीसाठी भाजपने दोन प्रस्ताव सादर केले होते. एक प्रस्ताव मुख्यमंत्री रेखा गुप्ता तर दुसरा कॅबिनेट मंत्री रविंद्र इंद्राज यांनी सादर केला.या प्रस्तावाला मंत्री मनजिंदरसिंह सिरसा आणि प्रवेश वर्मा यांनी पाठिंबा दिला.हे दोन्ही प्रस्ताव आवाजी मतदानाने पारित करण्यात आले. हंगामी सभापती अरविंदरसिंह लवली यांच्या नेतृत्वात निवडणूक करण्यात आली. या निवडीनंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी गुप्ता यांचे अभिनंदन केले. तथापि, विरोधी पक्षनेत्या आतिशी यांनी गुप्ता यांना शुभेच्छा देताना निराशा व्यक्त केली.

उर्दू, संस्कृतसह सहा भाषांमध्ये आमदारांचा शपथविधी

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आमदारांनी हिंदी, इंग्रजी, संस्कृत, उर्दू, मैथिली आणि पंजाबीसह सहा भाषांमध्ये शपथ घेतली. हंगामी सभापती लवली यांनी सर्व नवनिर्वाचित आमदारांना शपथ दिली. सर्वप्रथम मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि त्यांनतर त्यांच्या मंत्रिमंडळातील सहा मंत्र्यांनी शपथ घेतली. पर्यावरण मंत्री मनजिंदर सिंह सिरसा, करनैल सिंह यांनी पंजाबी, कायदा आणि विधिमंत्री कपिल मिश्रा, प्रद्याुम्न राजपूत,नीलम पहलवान, संजय गोयल, जितेंद्र महाजन, अजय महावर यांनी संस्कृतमध्ये तर अनिल झा यांनी मैथिली भाषेमध्ये शपथ घेतली.

Story img Loader