G20 Summit Delhi 2023 : जी २० शिखर परिषदेची नुकतीच सांगता झाली आहे. या परिषदेसाठी जगभरातील नेते आणि विविध देशांचे प्रतिनिधी भारतात आले होते. त्यांच्या स्वागतासाठी भारताने प्रचंड मेहनत घेतली होती. आधुनिक भारताची ओळख या माध्यमातून जगाला दाखवून देण्याचा प्रयत्न भारताकडून करण्यात आला. परदेशी पाहुण्यांचे आदरातिथ्य, पाहुणचार, जेवणावळी या सर्व बाबींवर जाणीवपूर्वक लक्ष ठेवण्यात आलं होतं. त्यांचं संपूर्ण शेड्युलच आखण्यात आलं होतं. परंत, एवढं सगळं करूनही भारताची मेहनत पाण्यात गेल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. दिल्लीत पावसाच्या आगमनाने परदेशी पाहुण्यांना पाण्यात बुडलेला भारत मंडपम पाहावा लागला आहे. याबाबत इंडियन युथ काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी. वी यांनी व्हिडीओ शेअर केला आहे.
हेही वाचा >> जी २० शिखर परिषदेची सांगता, नरेंद्र मोदींनी ‘या’ देशाकडे सोपावली पुढील अध्यक्षपदाची जबाबदारी
“जी २० च्या सदस्यांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करून तयार केलेल्या भारत मंडपमची ही दृष्ये. विकास पोहत आहे”, असं कॅप्शन देऊन श्रीनिवास यांनी पाण्याखाली गेलेल्या भारत मंडपमचा व्हिडीओ शेअर केला आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना, जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदासह अनेक दिग्गज नेते आणि प्रतिनिधी दोन दिवसीय शिबिरासाठी भारतात आले होते. विमानतळावर पारंपरीक नृत्य- संगीताने त्यांचे स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) प्रमुख क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांनी स्वागतादरम्यान सुहास्य वदनाने वाद्यांच्या तालावर ठेका धरला.
परदेशी पाहुण्यांच्या भाषेचीही काळजी यावेळी घेण्यात आली होती. जी२०चे प्रतिनिधी आणि इतर आंतरराष्ट्रीय पाहुणे हे परिषदस्थळी आले तेव्हा त्यांचे स्वागत त्यांच्या भाषेतही केले गेले. त्यानुसार जर्मनमध्ये ‘विलकोमेन’, तुर्कीमध्ये ‘होसगेल्डिनिझ’, फ्रेंचमध्ये ‘बिनेव्हेन्यु’, स्पॅनिशमध्ये ‘बिनेव्हेनिडो’, इंडोनेशियनमध्ये ‘सेलामत दातांग’ अशा शब्दांसह स्वागत फलक रंगविले होते.
जगभरात एकमेकांबद्दल कमी झालेल्या विश्वासाच्या समस्येवर विजय मिळवायचा असेल तर, सब का साथ, सब का विकास, सब का विश्वास, सब का प्रयास, हा भारताचा मंत्र अवघ्या जगासाठी मार्गदर्शक ठरू शकेल, असा सल्ला मोदींनी दिला. ‘जी-२०’ समूहाचा अध्यक्ष या नात्याने मी जगाला आवाहन करू इच्छितो की, अविश्वासाचे वातावरण दूर करून एकमेकांवर पुन्हा भरवसा दाखवावा. आता आपण एकमेकांना साह्य करून एकत्रितपणे पुढे जाण्याचा हा काळ आहे, असे मोदी म्हणाले.