गेल्या वर्षभराहून अधिक काळ आपण करोनासारख्या भीषण महामारीचा सामना करत आहोत. सार्वजनिक आरोग्य राखणं हे सद्यस्थितीत आपल्यासाठी एक अत्यंत मोठं आव्हान असतानाच आता देशातील एका राज्यात आणखी चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. हरियाणा राज्याच्या पलवल जिल्ह्यातील एका गावात तीन आठवड्यांत १४ वर्षांखालील किमान सात मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे, या जिल्ह्यातील आरोग्य अधिकारी या लहान मुलांच्या मृत्यूचं कारण शोधण्यासाठी धडपडत आहेत.
हरियाणाच्या पलवलपासून २० किमी अंतरावर असलेल्या चिल्ली गावात लहान मुलांच्या मृत्यूच्या आकडामुळे सध्या भीतीचं वातावरण आहे. यामुळे, आरोग्य अधिकारी या मुलांच्या मृत्यूचं कारण शोधण्यासाठी गावात तळ ठोकून आहेत. मात्र, या मुलांच्या मृत्यूमागचं कारण अद्याप अस्पष्टच आहे. दरम्यान, आरोग्य अधिकाऱ्यांकडून गावातील स्वच्छतेचा अभाव हे यामागचं एक मुख्य कारणं असल्याचं सांगितलं जात आहे. तर हे मृत्यू डेंग्यूच्या उद्रेकामुळे झाल्याचा येथील स्थानिकांचा दावा आहे.
जिल्ह्यातील आरोग्य अधिकारी म्हणतात की, आमच्या टीमला अद्याप याबाबत कोणतंही ठोस कारण सापडलेलं नाही. गावातील अस्वच्छतेमुळे उद्भवलेल्या अनेक आजारांमुळे या लहान मुलांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन केलेल्या सर्वेक्षणादरम्यान गेल्या २० दिवसात सात मृत्यूंची नोंद झाली आहे. तर गावातील रहिवासी आणि सरपंच असं म्हणतात की, गावात किमान नऊ मुलांचा मृत्यू झाला आहे.
२७५ घरांमधील २ हजार ९४७ जणांचं सर्वेक्षण
पलवलचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. ब्रह्मदीप संधू म्हणतात की, “आम्ही डेंग्यूची साथ नाही असं म्हणत नाही. परंतु, आत्तापर्यंत आम्हाला गावातून घेतलेल्या नमुन्यांमधून कोणताही अहवाल डेंग्यू पॉझिटिव्ह आलेला नाही.” दरम्यान, आरोग्य अधिकारी सध्या गावातील २७५ घरांमधील २ हजार ९४७ जणांचं सर्वेक्षण करत आहेत. मलेरिया, डेंग्यू, कोविड आणि इतर विषाणूजन्य रोगांची चाचणी करत आहेत, असं आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.
द इंडियन एक्स्प्रेसने यांपैकी सहा मृत मुलांच्या कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधला. यावेळी, एक कुटुंब वगळता अन्य सर्व कुटुंबांनी समानच लक्षणं नोंदवली आहेत. उदा. उच्च ताप, पुरळ, उलट्या, कमी प्लेटलेट संख्या. या कुटुंबांतील सदस्य म्हणाले की, तीव्र तापानंतर ३ ते ४ दिवसांच्या आत मुलांचा मृत्यू झाला.
२० दिवसांत नऊ मृत्यू
चिल्ली गावचे सरपंच नरेश कुमार यांनी सांगितलं की, गेल्या २० दिवसांत गावात तब्बल नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. “बहुतेक मुलांची चाचणी केलेल्या खाजगी लॅब्समार्फत गावकऱ्यांना असं सांगण्यात आलं की, ही प्रकरणं डेंग्यूशी संबंधित आहेत आणि प्लेटलेट्सची संख्या कमी आहे. तर सरकारी रुग्णालयाचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे. त्याचप्रमाणे, आणखी काही मुलं खाजगी रुग्णालयात दाखल आहेत. गेल्या आठवड्यात काही ग्रामस्थांनी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना आपल्या मुलांच्या मृत्यूची माहिती दिल्यानंतर आरोग्य विभाग तातडीने कामाला लागला आहे. त्यानंतर नमुने घेण्यात आले आणि आरोग्य अधिकाऱ्यांनी गावाला भेट दिली आहे.”
२५ पथकं कार्यरत
आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलं की, “गावात गेल्या २ आठवड्यात मृत्यू झालेल्या लहान मुलांच्या मृत्यूचं कारण, निदान, सर्वेक्षण आणि तपासणीसाठी आमची २५ पथकं कार्यरत आहेत. अस्वच्छता आणि दूषित पाणीपुरवठा यामुळे रोगांचा प्रसार होऊ शकतो. काही पाण्याचे पाईप नाल्यांमधून बाहेर पडत आहेत. त्यामुळे तेथे दूषितपणा आहे. तेथे योग्यरित्या पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे तिथे पाणी गोळा होतं, पावसाळ्यात डासांची संख्या वाढण्याची शक्यता असते.”
संपूर्ण गावाच्या RTPCR चाचणीचे आदेश
“आम्ही मलेरियासाठी २५० रॅपिड डायग्नाॅस्टिक टेस्ट आणि १९४ स्लाइड चाचण्या केल्या आहेत. या सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. करोनासाठी आरटी-पीसीआर चाचण्यांच्या ६४ नमुन्यांचे अहवाल देखील निगेटिव्ह आले आहेत. आम्ही डेंग्यूच्या चाचणीसाठी १२ नमुने पाठवले होते. परंतु, ते सर्व अहवाल नकारात्मक आले आहेत. दरम्यान, मी प्राधान्याने गाव स्वच्छ करण्यासाठी जिल्हाआयुक्तांना पत्र लिहिलं आहे. त्याचसोबत, संपूर्ण गावाने करोनासाठी आरटी-पीसीआर चाचणी करण्याचे देखील आदेश दिले आहेत”, असं डॉ. संधू यांनी यावेळी सांगितलं आहे.