शिवपूर/नवी दिल्ली : भारतातून नामशेष झालेल्या चित्त्यांच्या संवर्धनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या ‘प्रोजेक्ट चित्ता’ला मानवी आक्रमकतेचे धक्के बसू लागले आहेत. कुनो अभयारण्याच्या सीमेलगतच्या एका गावाच्या हद्दीबाहेर एका वासराची शिकार करण्याच्या प्रयत्नात असलेला मादी चित्ता आणि तिच्या चार बछड्यांवर ग्रामस्थांनी दगडफेक केली. यात चित्त्यांना दुखापत झाली नसली तरी, वन्यजीवप्रेमी आणि पर्यावरणवाद्यांनी ग्रामस्थांच्या कृतीवर टीका केली आहे.
अभयारण्यात वास्तव्यात असलेल्या चित्त्यांपैकी ज्वाला ही मादी आणि तिचे चार बछडे सोमवारी सकाळी नऊ वाजता शिवपूर जिल्ह्यातील एका गावाच्या हद्दीबाहेर चरत असलेल्या वासराची शिकार करू पाहात होते. ते पाहून आसपासच्या शेतांत काम करणारे शेतकरी व ग्रामस्थ गोळा झाले. त्यातील काहींनी चित्त्यांवर दगडांचा मारा सुरु केला. याची माहिती मिळताच वनकर्मचाऱ्यांचे पथक तेथे धडकले. या गोंधळामुळे बिथरलेल्या चित्त्यांनी जंगलात पळ काढला. सर्व चित्ते सुखरूप असल्याचे वन कर्मचाऱ्यांनी सांगितले.
मानव-वन्यजीव संघर्षाच्या या चित्रफिती समाजमाध्यमांवरून प्रसारीत झाल्या. एका अर्धवट अवस्थेतील रेल्वे पुलाजवळ हा संघर्ष झाल्याचे दिसत आहे. त्यात लाठ्याकाठ्या घेऊन चित्त्यांना हुसकावणारे ग्रामस्थ दिसत आहेत. या घटनेवर वन्यजीव कार्यकर्त्यांकडून नाराजी व्यक्त होत आहे. ‘राज्य सरकार आणि वनविभाग चित्त्यांच्या संवर्धनासाठी नियमावली जारी केल्याचे सांगत असले तरी, वास्तवातील चित्र भलतेच आहे,’ अशी टीका भोपाळमधील कार्यकर्ते अजय दुबे यांनी केली.
दरम्यान, सोमवारी येथील तेलीपुरा गावाजवळील शेतांमध्येही चित्ते आढळून आले. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. असे असले तरी ग्रामस्थांनी चित्त्यांच्या वाटेत अडसर आणू नये, असे आवाहन प्रकल्पाचे संचालक उत्तमकुमार शर्मा यांनी केले आहे. चित्त्यांनी एखाद्या गुराची शिकार केल्यास त्यांच्या मालकास योग्य भरपाई दिली जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे.
चित्ता प्रकल्पाची स्थिती
●पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२मध्ये चित्ता प्रकल्पाची संकल्पना राबवली. त्याअंतर्गत आफ्रिकेतून २० चित्ते कुनो राष्ट्रीय उद्यानात आणण्यात आले.
●त्यापैकी तीन मादी आणि पाच नरांचा मधल्या काळात वेगवेगळ्या कारणांमुळे मृत्यू झाला.
●आतापर्यंत १९ बछड्यांचा जन्म झाला असून त्यातील पाच जण दगावले आहेत.●कुनोत सध्या २६ चित्ते आहेत.