लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप असलेले भाजपाचे खासदार आणि भारतीय कुस्तीपटू संघटनेचे प्रमुख ब्रिजभूषण सिंह यांनी वादग्रस्त विधान केलं. त्यांनी स्वतःची तुलना प्रभू श्रीराम यांच्याशी करत पीडित महिला कुस्तीपटू विनेश फोगाटला महाभारतातील कैकेयीची सेविका मंथरेची उपमा दिली. यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. आता ब्रिजभूषण सिंह यांच्या आरोपांना विनेशा फोगाटने प्रत्युत्तर दिलं. विशेष म्हणजे महिला कुस्तीपटूंच्या दिल्लीतील आंदोलनाला आता एक महिना पूर्ण झाला आहे.
विनेश फोगाट म्हणाली, “ब्रिजभूषण सिंह घरी बसून मनात येईल ते वाईट बोलत आहे. तो ज्या पद्धतीने बोलत आहे त्यावरून तो कोणत्या मानसिकतेचा व्यक्ती आहे हे देशाला समजेल. आम्ही आमचा संघर्ष करत आहोत. ब्रिजभूषण माझं कुणी काहीच करू शकत नाही असा निश्चिंत बसला आहे. तो स्वतः देशाचा पंतप्रधान आहे आणि त्याच्या केसालाही कुणी धक्का लावू शकत नाही, याप्रमाणे वागत आहे.”
“ब्रिजभूषणाला अटक होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवू”
“जोपर्यंत ब्रिजभूषणाला अटक होत नाही, तोपर्यंत आम्हीही आमचं आंदोलन सुरूच ठेवू. ब्रिजभूषण सिंह म्हणजे उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालय नाही. देशाच्या संविधानाप्रमाणे ज्याच्यावर आरोप होतात त्याची चौकशी होते. त्याचाच तपास होतो. मात्र, आमच्या प्रकरणात आरोपीपेक्षा पीडित मुलींनाच जास्त त्रास दिला जात आहे,” असा आरोप विनेश फोगाटने केला.
“ब्रिजभूषण सिंहची नार्को टेस्ट झाली तर…”
“आता ब्रिजभूषण सिंह म्हणत आहे की, नार्को टेस्ट करा. त्यांनी सहा-सात लोकांची नार्को टेस्ट करावी. मात्र, आमची मागणी आहे की, तुम्ही सहा सात लोकांची करा, पण स्वतःचीही नार्को टेस्ट करा. सात मुलींनी समोर येण्याची हिंमत दाखवत झालेल्या अत्याचाराची तक्रार केली आहे. ब्रिजभूषण सिंहची नार्को टेस्ट झाली तर लैंगिक अत्याचार झालेल्या किती मुली समोर येतील याची गणिती नाही,” असंही विनेश फोगाटने नमूद केलं.