Vinesh Phogat : महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने एक पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकात तिने भाजपाच्या नेत्या बबिता फोगट यांनीच ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात कट रचल्याचा उल्लेख केला आहे. या आरोपांची राळ ताजी असतानाच आता काँग्रेस आमदार विनेश फोगटने साक्षी मलिकच्या आरोपांना उत्तर दिलं आहे.

साक्षी मलिकचं म्हणणं काय?

साक्षी मलिकने आपल्या ‘विटनेस’ या पुस्तकात कुस्तीपटूंच्या आंदोलनाबाबत स्वतःचे मत मांडले आहे. या पुस्तकाच्या निमित्ताने तिने इंडिया टीव्ही या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये विनेश फोगटवर आरोप केला. मलिकने सांगितले की, बबिता फोगटने कुस्तीपटूंची बैठक घेतली होती आणि त्यांना ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात गैरव्यवहार आणि विनयभंगाचे आरोप करण्यास सांगितले होते. ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधातलं आंदोलन भाजपाच्याच नेत्या असलेल्या माजी कुस्तीपटू बबिता फोगट यांच्या सांगण्यावरून झाल्याचा दावा ऑलिम्पिक पदक विजेती कुस्तीपटू साक्षी मलिकने केला आहे. ब्रिजभूषण सिंह यांना बाजूला करून बबिता फोगटला कुस्ती महासंघाचे अध्यक्ष व्हायचे होते, असाही दावा साक्षी मलिकने केला आहे.

आम्ही बबिताचे अंधानुकरण केलं नाही

साक्षी मलिक पुढे म्हणाली, “आम्ही बबिता फोगटचे आंधळेपणाने अनुकरण केले असे नाही. कारण महासंघात विनयभंग आणि छळवणुकीचे प्रकार खरोखरच घडले होते. आम्हाला वाटले की, कुस्ती महासंघाला एखादी महिला अध्यक्ष त्यातही बबिता फोगट सारखी खेळाडू प्रमुख म्हणून लाभली तर सकारात्मक बदल होऊ शकतील. तिला आमचा संघर्ष समजू शकतो, अशी आमची अपेक्षा होती. पण ती आमच्याबरोबरच एवढा मोठा खेळ खेळेल, याची मात्र आम्हाला कल्पना नव्हती.” “आम्हाला वाटले की, तीही आमच्याबरोबर आंदोलनाला बसेल आणि अन्याय-छळवणुकीच्या विरोधात आवाज उचलेल. पण तसे झाले नाही”, अशीही टीका साक्षी मलिकने केली. यानंतर आता विनेश फोगटने तिला उत्तर दिलं आहे.

हे पण वाचा- Sakshi Malik: “ब्रिजभूषण सिंह यांनी त्यांच्या बेडवर मला…”, लैंगिक अत्याचार प्रकरणी साक्षी मलिकचा धक्कादायक दावा

विनेश फोगटने काय म्हटलं आहे?

साक्षी मलिक जे म्हणतेय ते काही मला कुणी लिहून दिलं नव्हतं. एक चांगला कोच मिळावा म्हणून आम्ही लढत होतो. तो मिळेपर्यंत आमचा लढा सुरुच राहणार आहे. आम्ही दोषी माणसाला शिक्षा होईपर्यंत शांत बसणार नाही असं विनेश फोगटचं म्हणणं आहे. त्यावर तुमच्या मनात स्वार्थ निर्माण झाला होता का? असं विचारल्यावर विनेश म्हणाली, “कसला स्वार्थ? साक्षी आरोप करत असेल तर तिला विचारा की तिला काय म्हणायचं आहे. खेळाडू असल्याच्या नात्याने आपल्या बहिणींसाठी आपल्या मल्लांसाठी बोलणं तर होय मी स्वार्थ साधला. जर ऑलिम्पिकपर्यंत आपल्या महिला मल्ल गेल्या पाहिजेत आणि त्यांनी मेडल जिंकलं पाहिजे असं आम्हाला वाटणं हा स्वार्थ असेल तर मी स्वार्थी आहे. असा स्वार्थ असेल तर तो प्रत्येकाला असला पाहिजे. ” असं उत्तर विनेशने दिलं आहे.