Vinesh Phogat on PM Narendra Modi’s Phone Call: नुकत्याच पार पडलेल्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी मिळवलेल्या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्याशी संवाद साधल्याचं पाहायला मिळालं. मेडल जिंकल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी मोदी संबधित खेळाडूशी फोनवर संवाद साधून त्याचं किंवा तिचं अभिनंदन करत होते. या संवादाचे व्हिडीओ नंतर सोशल मीडियावरून शेअरही करण्यात आले. मात्र, यादरम्यान चर्चा रंगली ती विनेश फोगटची. ऑलिम्पिकमधून अनपेक्षितपणे अपात्र ठरल्यानंतर मोदींची इच्छा असून विनेश फोगटनं त्यांच्याशी फोनवर बोलण्यास नकार दिल्याचं सांगितलं जातं. याबाबत आता खुद्द विनेशनंच स्पष्टीकरणादाखल मोठा दावा केला आहे.

भारताची माजी ऑलिम्पिक कुस्तीपटू व काँग्रेसची हरियाणाच्या जुलान मतदारसंघातली उमेदवार विनेश फोगटनं ‘लल्लनटॉप’शी बोलताना यासंदर्भात भूमिका मांडली आहे. यंदाच्या ऑलिम्पिकमधून अपात्र ठरल्यामुळे अंतिम फेरीच्या काही तास आधी बाहेर पडल्यानंतर विनेश फोगट चर्चेत आली. यासंदर्भात ऑलिम्पिक व्यवस्थापन समिती व थेट लवादापर्यंत हे प्रकरण गेलं. पण विनेशला पदक देता येणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केल्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला. पण विनेश अपात्र ठरल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिच्याशी फोनवर संवाद साधण्याची इच्छा व्यक्त केली होती, मात्र तिने नकार दिल्याचं आता समोर आलं आहे.

Vinesh Phogat: विनेश फोगट भारत सोडून जाणार होती, प्रियांका गांधींमुळे थांबली; म्हणाली, “आमचं सगळं ठरलं होतं पण…”!

काय म्हणाली विनेश फोगट?

पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोलण्यास नकार का दिला? यावर विनेशनं स्पष्टीकरणादाखल मोठा दावा केला आहे. “पंतप्रधान मोदींकडून फोन आला होता. मला थेट आला नाही, पण तिथे जे भारतीय पदाधिकारी होते, त्यांच्या मोबाईलवर फोन आला होता. तिथून सांगितलं गेलं की मोदींना तुमच्याशी बोलायचं आहे. मी चालेल म्हणाले. पण त्यानंतर त्यांनी माझ्यासमोर काही अटी ठेवल्या”, असा दावा विनेशनं केला आहे.

विनेश फोगटला NADA ने बजावली नोटीस (फोटो-लोकसत्ता)

“ते म्हणाले की मी मोदींशी बोलत असताना तिथे माझ्या टीममधलं कुणीही असणार नाही. त्यांची दोन माणसं असतील. त्यातला एक आमच्या संवादाचं व्हिडीओ रेकॉर्डिंग करेल आणि दुसरा फोनवर बोलणं करून देईल. हा व्हिडीओ नंतर सोशल मीडियावर पोस्ट होईल असंही ते म्हणाले. मी पुन्हा खात्री करण्यासाठी त्यांना विचारलं की हा व्हिडीओ सोशल मीडियावर जाईल का? तर त्यावर ते हो म्हणाले. तेव्हा मी त्यांना बोलण्यास नकार दिला. मी म्हटलं, मी अशा प्रकारे माझ्या भावनांची, माझ्या मेहनतीची सोशल मीडियावर चेष्टा करवून घेणार नाही”, असं विनेश फोगटनं सांगितलं.

“कदाचित मोदींना ठाऊक आहे की ज्या दिवशी माझ्याशी बोलणं होईल…”

दरम्यान, विनेश फोगटनं यावेळी मोदींवर आरोप केला. “जर त्यांना खरंच आमच्याशी बोलायचं असेल, त्यांना खेळाडूंची काळजी असती, तर त्यांनी आमचं संभाषण रेकॉर्ड न करता फोन केला असता. तसं झालं असतं तर मी त्यांची खूप आभारी राहिले असते. कदाचित त्यांना हे माहिती आहे की ज्या दिवशी विनेशशी बोलणं होईल, त्या दिवशी ती गेल्या दोन वर्षांचा हिशेब नक्की मागेल. बहुधा म्हणूनच त्यांनी माझ्या बाजूने कुणाचाही फोन त्या संभाषणावेळी तिथे नसेल अशी अट ठेवली होती. कारण ते झालेलं संभाषण एडिट करून टाकू शकतात. पण मी तर बोललेलं सगळं एडिट न करता टाकेन ना. मग त्यांनी यासाठी नकार दिला”, असं विनेश फोगट म्हणाली.

Vinesh Phogat : ‘मी राजकारणात येणार नव्हते, पण जेव्हा…’, विनेश फोगटचा मोठा खुलासा; म्हणाली, ‘मला जाणवले की परिस्थिती…’

का झाली विनेश फोगट अपात्र?

पॅरिस ऑलिम्पिकच्या ५० किलो वजनी गटातील कुस्ती स्पर्धेचं महिला गटाचं सुवर्णपदक विनेशच्या रुपात निश्चित मानलं जात होतं. पण अंतिम फेरीच्या काही तास आधी केलेल्या वजन चाचणीत विनेशचं वजन ५० किलो १०० ग्रॅम भरलं. त्यामुळे ऑलिम्पिक व्यवस्थापन समितीनं विनेशला अपात्र ठरवलं. तसेच, अंतिम फेरीत पोहोचल्यामुळे रौप्य किंवा कांस्य पदक मिळावं, ही मागणीही फेटाळून लावण्यात आली.