Vinesh Phogat काँग्रेस पक्षात महिला कुस्तीपटू विनेश फोगटने प्रवेश केला आहे. तिच्यासह बजरंग पुनियानेही काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. या दोघांनी काही दिवसांपूर्वी राहुल गांधींची भेट घेतली होती. त्यानंतर हे दोघंही काँग्रेस पक्षात प्रवेश करतील अशा चर्चा होत्या. काही वेळापूर्वी विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया या दोघांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पॅरिस ऑलिम्पिकमुळे विनेश फोगाट चर्चेत

मागच्याच महिन्यात पार पडलेल्या पॅरिस ऑलिम्पिकमुळे विनेश फोगटची चर्चा रंगली होती. विनेश फोगटचं वजन १०० ग्रॅम जास्त भरलं होतं. त्यामुळे तिला ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवण्यात आलं होतं. तसंच ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात लैंगिक शोषणाचे आरोप करत महिला मल्लांनी जे आंदोलन केलं त्यातही विनेश फोगट आणि साक्षी मलिक यांची चर्चा झाली होती कारण या दोघींनी या आंदोलनासाठी पुढाकार घेतला होता. तसंच बजरंग पुनियाने या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. आता बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. तसंच काँग्रेस पक्षात का प्रवेश केला ते कारणही सांगितलं आहे.

काय म्हटलं आहे विनेश फोगटने?

काँग्रेसने मला त्यांच्या पक्षात प्रवेश दिला यासाठी मी त्यांची ऋणी आहे. काँग्रेसचे मी धन्यवाद देते. मला आज अभिमानास्पद वाटतं आहे. मी अशा एका पक्षात प्रवेश केला आहे जो पक्ष महिलांना न्याय मिळावा म्हणून रस्त्यापासून ते संसदेपर्यंत लढायला तयार आहे. जेव्हा आम्हाला रस्त्यावर फरफटत आणि खेचत नेत होते तेव्हा आम्हाला भाजपा सोडून सगळ्या पक्षांनी साथ दिली. आज मी एका नव्या आयुष्याची सुरुवात करते आहे. तसंच महिलांसाठी आम्ही जो आवाज उठवला होता ती लढाई संपणार नाही ती लढाई सुरु राहणार आहे, आम्ही मागे हटणार नाही.

मी प्रत्येक महिला खेळाडूच्या मागे उभी आहे

विनेश फोगट म्हणाली, मी आज तुम्हाला आश्वस्त करु इच्छिते की ज्या महिला खेळाडूला वाटतं आहे की मी एकटी पडले आहे, असहाय झाली आहे, त्या प्रत्येक महिला खेळाडूबरोबर मी उभी आहे. मी ठरवलं असतं तर जंतरमंतरच्या आंदोलनात कुस्तीला अलविदा केला असता. मात्र भाजपाच्या आयटी सेलने या अफवा पसरवल्या की माझं करिअर संपलं आहे त्यामुळे मी आंदोलनात उतरले. पण त्या आंदोलनानंतर मी राष्ट्रीय स्पर्धा आणि ऑलिम्पिकमध्येही सहभागी झाले होते. आमची लढाई सुरुच राहणार आहे. असं विनेशने माध्यमांना सांगितलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vinesh phogat first reaction after joining congress what did she say scj