जनता दल संयुक्तचे प्रमुख नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा भरतीय जनता पार्टीबरोबर युती करून बिहारमध्ये सत्तास्थापन केली आहे. २०२० च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर नितीश कुमार यांनी भाजपाच्या साथीने राज्यात सत्तास्थापन केली होती. परंतु, काही महिन्यांनी त्यांनी भाजपाबरोबरची युती तोडून राष्ट्रीय जनता दलबरोबर आघाडी केली आणि राज्यात सत्तास्थापन केली. तसेच नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले. नितीश कुमार यांनी आता राजदची साथ सोडून पुन्हा एकदा भाजपाशी घरोबा केला आहे. नितीश कुमार यांनी असा निर्णय का घेतला? याबाबत अद्याप कोणीही स्पष्ट उत्तर दिलेलं नाही. अशातच भाजपा नेते आणि बिहार भाजपाचे प्रभारी विनोद तावडे यांनी नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा भाजबारोबर संसार थाटण्याचं कारण सांगितलं.
विनोद तावडे म्हणाले, आम्ही (भाजपा) आणि नितीश कुमार यांचा संयुक्त जनता दल हे दोन पक्ष मिळून बिहारचा राज्यकारभार चालवत होतो. आमचे आमदार जास्त असूनही आम्ही नितीश कुमार यांना मुख्यमंत्री केलं होतं. परंतु, त्यांच्या मनातली असुरक्षिततेची भावना आणि लालू प्रसाद यादव यांनी नितीश कुमार यांना दिलेली आश्वासनं यामुळे नितीश कुमार लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलबरोबर गेले. त्यांनी आमच्याबरोबरची युती तोडून राजदबरोबर राज्यात सत्ता स्थापन केली. परंतु, यामध्ये कळीचा मुद्दा ठरणारी घटना म्हणजे सव्वादोन महिन्यांपूर्वी बंगळुरू येथे इंडिया आघाडीच्या बैठकीत नितीश कुमारांकडे झालेलं दुर्लक्ष.
माजी आमदार विनोद तावडे म्हणाले, “बंगळुरू येथे झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची पंतप्रधनपदाचा उमेदवार म्हणून निवड करण्यात आली. तेव्हा नितीश कुमार यांना समजलं की, आपल्याला या लोकांनी वापरून घेतलं आहे. तिथे नितीश कुमार यांची जी मानसिकता होती, त्या मानसिकतेचा आम्ही स्वाभाविकपणे लाभ घेण्याचा प्रयत्न केला. त्यादृष्टीने आम्ही त्यांच्याशी संवाद सुरू केला. परंतु, चर्चेची गाडी पुढे जात नव्हती. परंतु, जेव्हा लालू प्रसाद यादव यांनी नितीश कुमार यांचा संयुक्त जनता दल पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या १० आमदारांना राजदबरोबर घेऊन तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री बनवण्याचा प्रयत्न केला गेला ती गोष्ट नितीश कुमार यांना खटकली. त्याचबरोबर आम्हालाही ते चालणार नव्हतं.” विनोद तावडे एबीपी माझाच्या माझा कट्ट्यावर बोलत होते.
हे ही वाचा >> राज्यपाल सत्तास्थापनेचं आमंत्रण देईनात? चंपई सोरेन यांनी केली आमदारांची परेड; म्हणाले, “आता फक्त…”
बिहार भाजपाचे प्रभारी विनोद तावडे म्हणाले, तेजस्वी यादव बिहारचे मुख्यमंत्री होणं आम्हालाही चालणार नव्हतं. आम्ही एक राजकीय पक्ष आहोत. आम्हाला जसं सत्तेत यायचं असतं. तसंच राज्याचं हित जपायचं असतं. तेजस्वी यादव मुख्यमंत्री होऊन त्यांचं बिहारमध्ये सरकार आलं असतं तर राज्यात गुंडाराज सुरू झालं असतं. ते आम्हाला येऊ द्यायचं नव्हतं. आम्ही अनेकदा म्हटलं होतं की नितीश कुमार यांच्याबरोबर युती करणार नाही. परंतु, राजकारणात नेहमीच तसं करता येत नाही. तम्हाला राजकारणात सातत्याने बदलत्या स्थितीचा आढावा घेत आणि स्वतःचा विचार कायम ठेवत पुढं जावं लागतं.