महिला कुस्तीपटूंवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर भाजपा खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधातच नव्हे तर कुस्ती महासंघाचे सचिव विनोद तोमर यांच्याविरोधातही आरोपपत्र दाखल केलं आहे. दिल्ली पोलिसांनी आरोपपत्रात म्हटलं आहे की, विनोद तोमर ब्रिजभूषण सिंह यांना सर्व प्रकारची मदत करत होते. एखादी महिला कुस्तीपटू ब्रिजभूषण सिंह यांना भेटायला गेली असेल तर ती तिथे एकटीच असेल याची काळजी विनोद तोमर घेत होते.
विनोद तोमर हे गेल्या दोन दशकांहून अधिक काळ भारतीय कुस्ती महासंघाशी संबंधित आहेत. याप्रकरणात आपण निर्दोष असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यांच्याविरोधात पोलिसांनी भारतीय दंड विधानातील कलम ५०६ (धमकावणे, घाबरवणे), कलम १०९, ३५४ आणि ३५४अ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
एका तक्रारदार महिला कुस्तीपटूने म्हटलं आहे की, ती तिच्या पतीबरोबर दिल्लीतल्या अशोक रोड येथील रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या कार्यालयात गेली होती, परंतु ब्रिजभूषण सिंह यांना भेटण्याची वेळ आल्यावर तोमर यांनी केवळ तिला एकटीलाच कार्यालयात भेटायला जाण्याची परवानगी दिली. विनोद तोमर यांनी तिच्या पतीला कार्यालयाबाहेरच थांबायला सांगितलं. त्याच दिवशी या महिला कुस्तीपटूचं लैंगिक शोषण झालं. दुसऱ्या दिवशी तिला पुन्हा फेडरेशनच्या कार्यालयात बोलावण्यात आलं होतं. त्या दिवशीसुद्धा तोमर यांनी तिच्या पतीला कार्यालयाबाहेरच रोखलं. तोमर यांनी या महिला कुस्तीपटूच्या पतीला अशा ठिकाणी बसवलं जिथून ब्रिजभूषण यांचं कार्यालय दिसणार नाही. त्या दिवशीसुद्धा या महिला कुस्तीपटूचं लैंगिक शोषण केलं गेलं. या दोन्ही घटना २०१७ मधील आहेत.
विनोद तोमर यांनी त्यानंतर त्या महिला कुस्तीपटूला आपल्या घरी बोलावलं होतं. त्यावेळी विनोद तोमर यांनी तिचा अपमान केला. तसेच ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र न ठरल्याबद्दल तिचा मानसिक छळ केला, तसेच तिला त्रास दिला.
आणखी एका महिला कुस्तीपटूने तिच्या तक्रारीत म्हटलं आहे की, ती ब्रिजभूषण सिंह यांना भेटायला गेली तेव्हा तिच्या प्रशिक्षकांना तोमर यांनी जाणूनबुजून बाहेर थांबवलं. एका मीटिंगसाठी कुस्ती महासंघाच्या कार्यालयात पोहोचल्यावर विनोद तोमर आधी ब्रिजभूषण सिंह यांच्या चेंबरमध्ये गेले. त्यानंतर ते बाहेर आले आणि त्यांनी कुस्तीपटूला एकटीलाच आत जायला सांगितलं. ती आत गेल्यावर ब्रिजभूषण सिंह यांनी तिचं लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला, तसेच तिच्याकडे सेक्शुअल फेवरची मागणी केली.