Manipur Violence: गेल्या वर्षभरापासून मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या घटना सातत्याने घडत आहेत. या हिंसाचाराच्या घटनामध्ये आतापर्यंत शेकडो लोकांचा मृत्यू झाला, तर हजारो लोक बेघर झाले आहेत. मात्र, तरी मणिपूरमध्ये अद्यापही शांतता प्रस्थापित झाली नसल्याचं पाहायला मिळत आहे. मणिपूरमधील हिंसाचाराच्या घटनांवरून विरोधी पक्षांकडून केंद्र सरकारला कायम लक्ष्य केलं जातं. यावर ३१ डिसेंबर रोजी मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी हिंसाचाराच्या मुद्द्यावरून खेद व्यक्त करत माफी मागितली होती. त्यानंतर आता नव्या वर्षांत अर्थात २०२५ मध्ये तरी मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित होईल असं बोललं जात होतं. मात्र, मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उसळला आहे.

कुकी बंडखोरांनी कांगपोकपीत प्रवेश करत शहरातील उपायुक्तांच्या कार्यालयावर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात कांगपोकपीचे पोलीस अधीक्षक (एसपी) जखमी झाल्याचं वृत्त समोर येत आहे. आधी मोर्चा काढला आणि त्यानंतर प्रशासकीय मुख्यालयावर हल्ला केला असल्याचं सांगितलं जात आहे. या चकमकीत एक पोलीस अधीक्षक जखमी झाले आहेत. यानंतर कांगपोकपी शहरात तणाव निर्माण झाला आहे. तसेच पोलिसांचे येथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र, अद्याप त्या ठिकाणी तणाव असून पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. यासंदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

हेही वाचा : Bengaluru Crime : ड्रायव्हर चुकीच्या दिशेला वळाला अन् तरुणीने मारली रिक्षातून उडी, बंगळुरूत मध्यरा‍त्री थरारक घटना

दरम्यान, कांगपोकपी हा मणिपूरमधील जिल्हा आहे. त्या ठिकाणी कुकी आणि इतर आदिवासी समुदायांचे प्राबल्य आहे. या भागात याआधीही हिंसाचाराच्या घटना समोर आल्या होत्या. यानंतर आज एका गटाने थेट उपायुक्त कार्यालयावरच हल्ला केला. यामध्ये काही प्रशासकीय वाहनांचीही तोडफोड करण्यात आली. सध्या परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला आहे.

हिंसाचाराच्या घटनांवरून मुख्यमंत्र्यांनी मागितली होती माफी

मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या घटनांवरून ३१ डिसेंबर रोजी मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी राज्यात सुरू असलेल्या हिंसाचाराच्या मुद्द्यावर खेद व्यक्त करत माफी मागितली होती. ते म्हणाले होते की, “हे संपूर्ण वर्ष खूप दुर्दैवी होते. मला खेद वाटतो आणि गेल्या ३ मे पासून आजपर्यंत जे काही घडत आहे त्याबद्दल मी राज्यातील जनतेची माफी मागू इच्छितो. घटनांमध्ये अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावले आहे आणि अनेकांना आपले घर सोडून जावे लागले. मला याचा खूप खेद वाटतो. मला सर्वांची माफी मागायची आहे”, असं मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी म्हटलं होतं.

Story img Loader