गेल्या काही महिन्यांपासून मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. त्यामुळे तेथे कायम तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. हिंसाचाराच्या घटनांमध्ये अनेक लोकांचा मृत्यूही झाला होता. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्करालाही पाचारण करण्यात आलं होतं. त्यानंतर तेथील परिस्थिती हळूहळू नियंत्रणात येत आहे. मात्र, असे असतानाच आता मणिपूरच्या जिरीबाम जिल्ह्यात शनिवारी संशयित अतिरेक्यांनी पोलीस चौकी जाळल्याची घटना घडली आहे. तसेच काही घरेही जाळले असल्याचे सांगण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अतिरेक्यांनी शुक्रवारी रात्री येथील जिरीबाम जिल्ह्यात एका पोलीस चौकीवर आणि काही घरांवर हल्ला केला. त्यानंतर पोलीस चौकी आणि काही घरांना आग लावली. या घटनेनंतर जिरीबाम जिल्ह्यातील प्रशासन अलर्ट झालं असून या परिसरातील तब्बल २०० पेक्षा जास्त लोकांना मदत करत छावण्यांमध्ये पाठवण्यात आले आहे. दरम्यान, बोटीतून आलेल्या अतिरेक्यांनी हा हल्ला केला असल्याचं सांगण्यात येत आहे. जिरी या पोलीस चौकीला दुपारी आग लावण्यात आली, तर जिरीबाम जिल्ह्याच्या बाहेरील भागात अनेक घरे जाळली आहेत. तर काही ठिकाणी अंधाराचा फायदा घेत हल्ले करण्यात आले आहेत. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्सप्रेसनं दिलं आहे.

हेही वाचा : एनडीएला बहुमत मिळताच भाजपा कार्यकर्त्याने दिला बळी; देवीला दान केली स्वत:ची बोटं

राजधानी इंफाळपासून तब्बल २२० किमी अंतरावर असलेल्या लामता खुनो, मोधूपूर भागातही हल्ले झाले आहेत. यानंतर मणिपूर पोलिसांच्या कमांडो तुकडीला शनिवारी सकाळी इम्फाळहून जिरीबाम येथे विमानाने पाठवण्यात आले आहे. दरम्यान, येथील काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार अंगोमचा बिमोल अकोइजाम यांनी राज्य सरकारला जिरीबाम जिल्ह्यातील लोकांच्या जिवाचे रक्षण करण्याची विनंती केली.

अकोइजाम पत्रकार परिषदेत म्हणाले, “मी जिरीबामच्या जिल्हा अधिकाऱ्यांशी बोललो आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की त्या ठिकाणी पोलीस पोहचले असून शहरातील लोकांना सुरक्षा पुरवली जात आहे. दरम्यान, जिरीबाम जिल्ह्यातील जवळपास २०० पेक्षा जास्त लोकांना त्यांच्या गावांमधून बाहेर काढण्यात आले आहे आणि जिरी शहरातील क्रीडा संकुलात आश्रय घेत आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, कॅम्पमध्ये पाठवण्यात आलेले लोक जिरीबाम शहरापासून ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या गावातील रहिवासी आहेत. हिंसाचारावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य पोलिसांचे पथक दाखल झाले आहे. दरम्यान, ६ जून रोजी जिरीबाम जिल्ह्यात एका समुदायातील ५९ वर्षीय व्यक्तीची दुसऱ्या समुदायातील व्यक्तींनी हत्या केल्याचा आरोप आहे. त्यानंतर तेथे तणाव निर्माण झाला होता. हे कारण या हिंसाचारामागे असल्याचं सांगितलं जात आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Violence again in manipur in jiribam district militants burnt several houses including a police post gkt
Show comments