पीटीआय, इम्फाळ

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मणिपूरच्या विष्णुपूर जिल्ह्यात शुक्रवारी उशिरा रात्री झालेल्या हिंसाचारात अतिरेक्यांनी वडील आणि मुलासह तिघाजणांची हत्या केली.
विष्णुपूर जिल्ह्यातील क्वाक्ता हे तिघे झोपेत असताना अतिरेक्यांनी त्यांना गोळय़ा घातल्या आणि नंतर तलवारीने त्यांचे तुकडे केले. हल्लेखोर चुडाचांदपूरहून आले होते, असे पोलिसांनी शनिवारी सकाळी सांगितले.

‘हे तिघे निवारा शिबिरात राहात होते, मात्र परिस्थितीत सुधारणा झाल्यामुळे ते शुक्रवारी क्वाक्ता येथील त्यांच्या घरी परतले होते. या घटनेनंतर लगेचच संतप्त जमाव क्वाक्ता येथे गोळा झाला आणि चुडाचांदपूरला जाण्याची तयारी केली, पण सुरक्षा दलांच्या जवानांनी त्यांना थांबवले’, अशी माहिती पोलिसांनी दिली.

‘क्वाक्ता येथे शनिवारी सकाळी सुरक्षा दले आणि अतिरेकी यांच्यात झालेल्या जोरदार गोळीबारात तीन जण जखमी झाले. पोलिसांना चेहऱ्यावर धातूंच्या तुकडय़ांच्या जखमा झाल्या. तिन्ही जखमींना उपचारासाठी इम्फाळच्या रुग्णालयात आणण्यात आले असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे’, असे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, या हिंसाचारामुळे जिल्हा प्रशासनाने इम्फाळ पूर्व आणि पश्चिम जिल्ह्यांमधील संचारबंदीत सूट देण्याचे तास कमी केले आहेत. आता ही संचारबंदी सकाळी पाच ते सायंकाळी सहाऐवजी सकाळी पाच वाजेपासून साडेदहा वाजेपर्यंत लागू राहील.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Violence again in manipur three killed by militants amy