राजस्थानपासून ते मध्य प्रदेशपर्यंत सातत्याने जातीय हिंसाचाराच्या बातम्या येत आहेत. मध्य प्रदेशातील नीमचमध्ये सोमवारी रात्री दोन समुदायांमध्ये हिंसक संघर्ष झाला. तणाव इतका वाढला, की मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करावा लागला. वातावरण पाहता परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे.
मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात
नीमचमधील जुनी कचरी परिसरात दोन समुदायांमध्ये जोरदार दगडफेक झाल्याचे सांगण्यात येत आहे. यादरम्यान अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली असून जाळपोळीच्या घटनाही समोर आल्या आहेत. या गोंधळानंतर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मिळालेल्या माहिनुसार हा हिंसाचार हनुमानाच्या मूर्ती प्रतिष्ठापणेवरुन झाला आहे. या भागात दर्ग्याजवळ हनुमानाची मुर्ती ठेवण्यात आली आल्याचा आरोप मुस्लिम समाजाकडून करण्यात आला आहे.
प्रतिबंधात्मक आदेश जारी
मध्य प्रदेशातील नीमचच्या अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी नेहा मीना यांनी पूर्वपरवानगीशिवाय मिरवणूक, धरणे किंवा मेळावा आयोजित करण्यावर पूर्ण बंदी लादणारा प्रतिबंधात्मक आदेश जारी केला. कोणतीही व्यक्ती किंवा संस्था परवानगीशिवाय कोणताही कार्यक्रम आयोजित करू शकत नाही. परवानगीशिवाय लाऊडस्पीकर वापरण्यासही मनाई आहे.
वादावादीचे रुपांतर दगडफेकीत
पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही बाजूचे लोक येथे जमले होते, त्यांच्यात वादावादी सुरू होती, त्यामुळे दोन्ही बाजूंना कंट्रोल रूमला बोलावण्यात आले. पण त्यानंतर काही लोकांनी दगडफेक केली. सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. मात्र, पोलीस व्हिडिओ फुटेजच्या माध्यमातून अराजकवाद्यांचा शोध घेत आहेत.