पीटीआय, बहराइच

उत्तर प्रदेशच्या बहराइच जिल्ह्यातील मन्सूर या गावात दोन गटांमधील हिंसाचारानंतर तणावाचे वातावरण आहे. या गावात रविवारी दुर्गाविसर्जनादरम्यान दोन गटांमध्ये दंगल होऊन एका २२ वर्षीय युवकाचा बळी गेला. तसेच १०पेक्षा जास्त व्यक्ती जखमी झाल्या. या घटनेनंतर संतप्त जमावाने सोमवारी रस्त्यावर उतरून दुकाने आणि वाहनांची जाळपोळ केली. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली आहे.

रामगोपाल मिश्रा असे रविवारी हिंसाचारात मरण पावलेल्या युवकाचे नाव आहे. त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले की, तो मिरवणुकीमध्ये सहभागी झाला असताना त्याला बंदुकीची गोळी लागली. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी सलमान नावाच्या एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून जवळपास ३० जणांना ताब्यात घेतले आहे.

रविवारच्या हिंसाचारानंतर अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात आली. काही जण हातामध्ये काठ्या आणि लोखंडी सळया घेऊन रस्त्यावर उतरले. निदर्शकांनी पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांविरोधात घोषणाबाजी केली. दुसरीकडे, पोलिसांनी हिंसाग्रस्त भागामध्ये ध्वजसंचलन केले. संतप्त जमावाने काही दुकाने, घरे आणि वाहनांना आग लावल्याने त्यामधून धुराचे लोट बाहेर पडत होते.

हेही वाचा >>>India vs Canada : कॅनडाच्या सहा राजनैतिक अधिकाऱ्यांना भारत सोडण्याचे आदेश; कॅनडा व्होट बँक पॉलिटिक्स करत असल्याचा आरोप

याप्रकरणी अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, गृह विभागाचे सचिव संजीव गुप्ता आणि अतिरिक्त पोलीस महासंचालक अमिताभ यश परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी घटनास्थळी गेले. तर, परिस्थिती नियंत्रणात आणली जात असून समाजकंटकांचा शोध घेतला जात आहे, असे जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक वृंदा शुक्ला यांनी सांगितले. दरम्यान, राजकीय नेत्यांनी प्रशासनाला कारवाई करण्याचे आणि राज्यातील जनतेला शांततेचे आवाहन केले आहे.

मुख्यमंत्री मृताच्या कुटुंबाला भेटणार

राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे मंगळवारी मृत रामगोपाल मिश्राच्या कुटुंबीयांची लखनौमध्ये भेट घेतील, अशी माहिती स्थानिक भाजप आमदार सुरेश्वर सिंह यांनी दिली. तसेच, याप्रकरणी कठोर कारवाई करण्याचा निर्धार मुख्यमंत्र्यांनी केल्याचेही सिंह यांनी सांगितले.

उत्तर प्रदेशातील शांतता आणि सलोखा बिघडवण्याचे कोणतेही कारस्थान यशस्वी होणार नाही. दंगलखोरांचे संरक्षण करणारे पुन्हा सक्रिय झाले आहेत. पण, आपण सावध आणि सतर्क असले पाहिजे.- केशवप्रसाद मौर्य, उपमुख्यमंत्री, उत्तर प्रदेश

बहराइचमधील हिंसाचाराचे वृत्त आणि प्रशासनाची निष्क्रियता अतिशय दु:खद आणि दुर्दैवी आहे. मी राज्याचे मुख्यमंत्री व प्रशासनाला तातडीने कारवाई करण्याचे, जनतेला विश्वासात घेण्याचे आणि हिंसा थांबवण्याचे आवाहन करते.-प्रियंका गांधी, नेत्या, काँग्रेस</strong>