Syria Violence News: सीरियात गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात तीव्र संघर्ष सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. या संघर्षात दोन दिवसांत तब्बल १ हजारांपेक्षा जास्त जण ठार झाले असल्याची माहिती सांगितली जाते. सीरियातील हा संघर्ष गेल्या १४ वर्षांच्या संघर्षातील सर्वात घातक ठरला असल्याचं म्हटलं जात आहे. सीरियात सध्या सुरु असलेला हा संघर्ष सीरियन सुरक्षा दल आणि पदच्युत अध्यक्ष बशर अल असद यांच्या समर्थकांमध्ये सुरु आहे.

सीरियन ऑब्झर्व्हेटरी फॉर ह्युमन राईट्सच्या मते हिंसाचाराचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे. काही लोकांना जवळून गोळ्या घालण्यात आल्या आहेत. या गोळीबारात शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक ठिकाणी या संघर्षामुळे वीज आणि पाणी खंडित करण्यात आलेलं आहे. एवढंच नाही तर या संघर्षात आणखी रक्तपात होण्याच्या भीतीने हजारो लोक सुरक्षित ठिकाणी पळून गेले असल्याची माहिती सांगितली जाते. या संदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

काही महिन्यांपूर्वी बशर अल असद देश सोडून पळून गेल्यानंतर सत्तेवर आलेल्या नवीन सरकारसमोर आता संघर्षाचं मोठं आव्हान निर्माण झालं आहे. दरम्यान, या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सरकारी दलांचं म्हणणं आहे की, बशर अल असदच्या समर्थकांकडून होणाऱ्या हल्ल्यांना प्रत्युत्तर दिल्यानंतर हिंसाचार मोठ्या प्रमाणात वाढला. यामध्ये सूड उगवणाऱ्याही काही घटना घडल्या. काही सुन्नी बंदूकधाऱ्यांनी असदच्या गटाला पाठिंबा देणाऱ्यांना लक्ष्य केलं.

काही प्रत्यक्षदर्शींनी या संपूर्ण परिस्थितीच्या भयानक दृश्यांचं वर्णन केलं आहे. रस्त्यावर मृतदेह पडले होते आणि घरे जळाली होती. काही माणसांना त्यांचं ओळखपत्र तपासल्यानंतर मारलं जात होतं. या संघर्षाच्या भितीने काही लोक जवळच्या डोंगरात पळून गेले, तर काहींनी ह्मीमिममधील रशियन हवाई तळावर आश्रय घेतला आहे. अद्यापही सीरियात मोठ्या प्रमाणात तणाव आहे. अनेक ठिकाणी लूटमार आणि जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान, समोर आलेल्या वृत्तानुसार या हिंसाचारात एक हजाराहून अधिक लोक मारले गेले आहेत. यापैकी ७४५ नागरिकांपैकी बहुतेकांना जवळून गोळ्या घालून ठार करण्यात आलं.

Story img Loader