इम्फाळ : मणिपूरच्या हिंसाग्रस्त जिरिबाम जिल्ह्यातून गेल्या आठवड्यात बेपत्ता झालेल्या तिघांचे मृतदेह शुक्रवारी सापडल्यानंतर नागरिकांमध्ये उसळलेल्या संतापाचे लोण राजधानी इम्फाळपर्यंत पसरले. मृतांना न्याय मिळण्याची मागणी करणाऱ्या संतप्त निदर्शकांनी तीन मंत्री आणि सहा आमदारांच्या निवासस्थानांना लक्ष्य केले. त्यानंतर प्रशासनाने इम्फाळ खोऱ्यात संचारबंदी लागू केली असून इंटरनेट सेवा बंद स्थगित करण्यात आली आहे.

गेल्या आठवड्यात जिरिबाममध्ये सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत कुकी-झो समुदायाचे १० बंडखोर ठार झाले होते. त्यावेळी मदत शिबिरामधील काही व्यक्ती बेपत्ता झाल्या होत्या. त्यापैकी दोघांचे मृतदेह दुसऱ्या दिवशी शोधमोहिमेदरम्यान सापडले तर एक महिला आणि दोन लहान मुले अशा तीन जणांचे मृतदेह शुक्रवारी मणिपूर-आसामच्या सीमेवर जिरी आणि बराक नद्यांच्या संगमाजवळ सापडले. यामुळे इम्फाळमध्ये संतापाची लाट पसरली.

हेही वाचा >>> ‘तू मेलास तरी फरक पडत नाही’, मोबाइलचं व्यसन जडलेल्या लहान मुलाचा वडिलांनीच केला निर्घृण खून

इम्फाळमध्ये संतप्त जमावाने सहा आमदारांपैकी तिघांच्या घराची नासधूस केली आणि त्यांच्या मालमत्तांना आग लावली. इम्फाळ खोऱ्यातील इम्फाळ पूर्व आणि पश्चिम, विष्णूपूर, थौबल आणि काचिंग या जिल्ह्यांमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडू लागल्यामुळे संचारबंदी लागू करण्यात आल्याची आणि सात जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा तात्पुरती खंडित करण्यात आली.

जमावाने आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री सपम रंजन यांच्या लाम्फेल सानकीथेल भागातील घरावर हल्ला केला. त्यानंतर ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्री एल सुसिंद्रो सिंह यांच्याही निवासस्थानावर हल्ला केला.

बंडखोरांचे मृतदेह चुराचांदपूरला हलवले

गुवाहाटी : दरम्यान, मागील सोमवारी जिरिबाममध्ये सुरक्षा दलांबरोबरच्या चकमकीत ठार झालेल्या १० कुकी-झो तरुणांचे बंडखोरांचे मृतेदह चुराचांदपूर येथे हलवण्यात आले आहेत. आसामच्या सिल्चर शहरामध्ये त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले होते. त्यानंतर हवाई मार्गाने त्यांचे मृतदेह चुराचांदपूरला पाठवण्यात आले.