नवी दिल्ली : मणिपूरमधील हिंसा रोखण्यात अपयशी ठरलेल्या मुख्यमंत्री एम बिरेन सिंह यांच्या विरोधात भाजपच्या आमदारांनी पंतप्रधानांना पत्र लिहिले असतानाच, काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी, मणिपूरमधील भयानक हिंसा म्हणजे मानवी शोकांतिका असून या घटनेने देशाच्या सदसद्विवेकावर जबर घाव घातला असल्याची खंत व्यक्त केली आहे.
सोनिया गांधी यांनी बुधवारी प्रसिद्ध केलेल्या दोन मिनिटांच्या चित्रफितीमध्ये केंद्र वा राज्य सरकारच्या निष्क्रियतेवर कोणतीही थेट टिप्पणी केलेली नाही. मात्र, मणिपूरमध्ये ३ मे पासून होत असलेल्या हिंसाचारात लोकांचे जीवन उद्ध्वस्त झाल्याचा संदर्भ देत, सोनिया गांधींनी, केंद्र व राज्यातील भाजपच्या सरकारांना अप्रत्यक्ष चपराक दिल्याचे मानले जात आहे.
दीड महिने सुरू असलेल्या हिंसाचारामध्ये अनेकांनी आपले प्रियजन गमावले आहेत. अनेकांना घर सोडून जावे लागले, आयुष्यभराची कमाई एका फटक्यात गमवावी लागली. शांततेने एकमेकांसोबत राहणारे आपले बंधुभगिनींवर अत्याचार होताना पाहणे हृदयद्रावक आहे, असे सोनिया गांधींनी म्हटले आहे. मणिपूरने आतापर्यंत सर्व जाती, धर्म आणि वेगवेगळय़ा पार्श्वभूमीच्या लोकांना सामावून घेतलेले आहे. बंधुभावाने राहण्यासाठी एकमेकांबद्दल विश्वास असावा लागतो. पण, द्वेषाची ज्वाळा पेटवण्यासाठी एक चूक पुरेशी असते, असे सोनिया गांधी म्हणाल्या.
मणिपूरची स्थलांतरित मुले मिझोरामच्या शाळांमध्ये
ऐझॉल : हिंसाचारग्रस्त मणिपूरमधून आपल्या कुटुंबासह स्थलांतरित झालेल्या दीड हजाराहून अधिक मुलांनी मिझोराममधील वेगवेगळय़ा शाळांमध्ये प्रवेश घेतला असल्याची माहिती शिक्षण खात्याच्या एका अधिकाऱ्याने दिली. या विस्थापित मुलांना सरकारी शाळांमध्ये मोफत प्रवेश देण्यात आला असल्याचे मिझोरामचे शिक्षण संचालक लालसांगलिआना यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले. या मुलांवर ओढवलेली परिस्थिती लक्षात घेता त्यांना सरकारी शाळांमध्ये मोफत प्रवेश देण्यात आला असल्याचे ते म्हणाले.