पीटीआय, इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयाबाहेर मंगळवारी अटक करण्यात आल्यानंतर पाकिस्तानात प्रचंड हिंसाचार उफाळला आहे. खान यांचे समर्थक रावळिपडीच्या लष्करी मुख्यालयामध्ये घुसले असून पेशावर, फैजलाबाद, क्वेट्टा या शहरांमध्ये मोठय़ा प्रमाणात दंगली उसळल्या आहेत. खान यांच्या अटकेचे वृत्त पसरताच संपूर्ण पाकिस्तानात तणावाचे वातावरण आहे.
मंगळवारी सकाळी खान हे लाहोरहून राजधानी इस्लामाबादला आले होते. एका खटल्याच्या प्रकरणी उच्च न्यायालयात त्यांची ‘बायोमॅट्रिक’ माहिती जमा केली जात असतानाच ‘रेंजर्स’ या निमलष्करी दलाचे जवान काच तोडून आत घुसले आणि त्यांनी खान यांना खेचत गाडीत बसविल्याचा आरोप पाकिस्तान तहरीर ए इन्साफ (पीटीआय) पक्षाच्या नेत्या शिरीन मझारी यांनी केला. पाकिस्तानच्या ‘नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरो’ने (एनएबी) बांधकाम व्यावसायिक मलिक रियाझ यांना जमीन हस्तांतरण केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात असले तरी खान सध्या कुठे आहेत, याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. त्यांना रावळिपडी येथील एनएबी मुख्यालयात नेण्यात आल्याचे सांगितले जात असले तरी पीटीआयचे नेते फवाद चौधरी यांनी खान यांना अज्ञात स्थळी नेण्यात आले असून तेथे त्यांचा छळ होत असल्याचा आरोप केला आहे.
पाकिस्तानचे गृहमंत्री राणा सनाउल्लाह यांनी हा आरोप फेटाळला. राष्ट्रीय मालमत्तेचे नुकसान केल्याच्या आरोपाबद्दल इम्रान अनेकदा नोटीस बजावूनही न्यायालयासमोर हजर झाले नाहीत. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आल्याचा दावाही सनाउल्लाह यांनी केला. दरम्यान, खान यांच्या अटकेचे वृत्त देशभर पसरताच त्यांच्या समर्थकांनी सर्व शहरांमध्ये आंदोलने सुरू केली आहेत. ही कारवाई म्हणजे सरकारी दहशतवादाचा प्रकार आहे अशी टीका पीटीआयकडून करण्यात येत आहे. रेंजर्सनी खान यांच्या वकिलांनाही मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. इम्रान यांच्या डोक्यावर आणि पायावर मार लागल्याची माहिती एका प्रत्यक्षदर्शी वकिलाने दिली. सरकारने मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
उच्च न्यायालयाचे ताशेरे
खान यांना उच्च न्यायालयातून झालेल्या अटकेबद्दल मुख्य न्यायाधीशांनी पोलिसांना जाब विचारला आहे. इम्रान खान यांना कोणत्या प्रकरणात आणि अशा पद्धतीने का अटक केली, याची माहिती प्रत्यक्ष हजर होऊन द्यावी, असे आदेश इस्लामाबादच्या पोलीस प्रमुखांना न्यायालयाने दिले. अन्यथा पंतप्रधानांना समन्स बजाविण्याचा इशाराही न्यायाधीशांनी दिला. त्यानंतर पोलीस महासंचालकांनी न्यायालयात हजर होत वॉरंट दाखविले आणि एनएबीने अटक केल्याची माहिती दिली.
लष्करावरील आरोपांमुळे कारवाई?
इम्रान खान यांनी सोमवारी एका लष्करी अधिकाऱ्यावर आपल्याला जीवे मारण्यासाठी कट रचल्याचा आरोप केला होता. लष्कराने या आरोपांचे खंडन केले असले तरी दुसऱ्याच दिवशी झालेल्या या कारवाईमुळे संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे खान यांना अटक करणारे ‘रेंजर्स’ गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत येत असले, तरी या दलाचे वरिष्ठ अधिकारी लष्करातील असतात.
अटकेपूर्वीचा संदेश
खान यांच्या अटकेनंतर त्यांचा एक दृकश्राव्य संदेश जारी करण्यात आला आहे. ‘‘माझे हे शब्द तुमच्यापर्यंत पोहोचतील, तोपर्यंत मला खोटय़ा प्रकरणात अटक झाली असेल. पाकिस्तानात मुलभूत हक्क आणि लोकशाहीचे दफन झाल्याचे यामुळे स्पष्ट होते. आपल्यावर लादण्यात आलेल्या भ्रष्ट आणि परकीय सरकारला मी पाठिंबा द्यावा, यासाठी हे सर्व करण्यात येत आहे,’’ असे खान यांनी या संदेशात म्हटले आहे.