Violence in UP due To DJ Songs: दसऱ्याच्या निमित्ताने देशभरात ९ दिवस चाललेल्या नवरात्री उत्सवाची सांगता झाली. अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहात देवीच्या विसर्जन मिरवणुकाही काढण्यात आल्या. मात्र, उत्तर प्रदेशातील अशाच एका विसर्जन मिरवणुकीला हिंसाचाराचं गालबोट लागलं. दोन समुदायांमध्ये झालेल्या या हिंसाचारामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला. यावेळी जमावानं पोलिसांच्या व्हॅन, आसपासची काही दुकानं व घरांना आग लावली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सखोल तपास सुरू झाला आहे. इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भातलं सविस्तर वृत्त दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकं घडलं काय?

हा सगळा प्रकार उत्तर प्रदेशच्या बाहरेच जिल्ह्यात घडला. मेहसी भागातून रविवारी संध्याकाळी दुर्गा देवी विसर्जन मिरवणूक निघाली होती. पण मिरवणूक मुस्लिम बहुल भागातून जात असताना दोन समुदायांमध्ये वाद झाला. त्याचं रुपांतर हाणामारीत झालं. हे प्रकरण इतकं विकोपाला गेलं की शेवटी पोलिसांना हिंसक झालेल्या जमावाला पांगवण्यासाठी गोळीबार करावा लागला. या गोळीबारात एक व्यक्ती जखमी झाली. राम गोपाल मिश्रा असं या २२ वर्षीय तरुणाचं नाव आहे. त्याला लागलीच उपचारांसाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला.

वाद नेमका कशामुळे सुरू झाला?

हा सगळा प्रकार DJ लावण्यावरून सुरू झाला. मिरवणुकीमध्ये मोठ्या आवाजात डीजेवर गाणी वाजवली जात होती. मिरवणूक मुस्लीम बहुल भागात आल्यानंतर तिथल्या स्थानिकांनी आवाज कमी करण्यास सांगितलं. त्यातून बाचाबाची सुरू झाली. दोन्ही बाजूंनी आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे प्रकरण चिघळलं आणि दोन्ही गट एकमेकांना भिडले. शेवटी पोलिसांना मध्यस्थी करावी लागली.

बांगलादेशात मंदिरांवरील हल्ल्यांची दखल, परराष्ट्र मंत्रालयाकडून चिंता व्यक्त

…आणि संतप्त जमावानं जाळपोळ सुरू केली!

पोलिसांच्या गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू झाल्याचं समोर आल्यानंतर संतप्त झालेल्या जमावानं घटनास्थळाच्या आसपास जाळपोळ करायला सुरुवात केली. यामध्ये पोलिसांच्या काही गाड्या जमावानं पेटवून दिल्या. त्याचबरोबर काही दुकानं आणि घरांनाही आग लावण्यात आली. यादरम्यान, मृत्यू झालेल्या तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. मात्र, संतप्त जमावाने जिल्हा रुग्णालयाच्या बाहेरदेखील आंदोलन केलं. जोपर्यंत संबंधितांवर कारवाई केली जात नाही, तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जाणार नाहीत, असा पवित्रा जमावाने घेतला आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतली गंभीर दखल

दरम्यान, या घटनेची गंभीर दखल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतली असून गोंधळ घालणाऱ्यांना सोडलं जाणार नाही, असा इशाराच त्यांनी दिला आहे. त्याचबरोबर या घटनेसाठी ज्यांचं दुर्लक्ष व हलगर्जीपणा जबाबदार ठरला, अशा पोलीस व प्रशासकीय अधिकाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असंही ते म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Violence in uttar pradesh during durga idol immersion procession over dj music one dead pmw