पीटीआय, इम्फाळ
मणिपूरमधील मोरेह जिल्ह्यामध्ये जमावाने किमान ३० रिकामी घरे आणि दुकानांना आग लावली, तसेच सुरक्षा दलांवर गोळीबारही केला. अधिकाऱ्यांनी बुधवारी यासंबंधी माहिती दिली. मे महिन्यापासून सुरू असलेल्या हिंसाचारामुळे घरदार सोडून निघून गेलेल्यांच्या घरांनाच जमावाने लक्ष्य केले. ही रिकामी घरे म्यानमारच्या सीमेजवळ मोरेह बाजार भागामध्ये आहेत.
या जाळपोळीनंतर जमाव आणि सुरक्षा दलांमध्ये गोळीबार झाला, मात्र त्यामध्ये कोणी जखमी किंवा मृत झाले का याबद्दल काही माहिती मिळाली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. कांगपोकपी जिल्ह्यामध्ये मंगळवारी जमावाने सुरक्षा दलांनी जवानांच्या वाहतुकीसाठी वापरलेल्या दोन बसना आग लावल्याचीही घटना घडली. या बस मंगळवारी संध्याकाळी दिमापूरहून परत येताना सपोरमेईना येथे जमावाने त्यांना आग लावली. त्यामध्ये कोणीही जखमी किंवा मृत झाल्याची माहिती नाही. स्थानिकांनी या बस थांबवल्या आणि त्यामध्ये अन्य समुदायाचे कोणी सदस्य आहेत का हे तपासण्याचा आग्रह धरला. त्यानंतर त्यातील काही जणांनी या बसना आग लावली.
दरम्यान, इम्फाळ जिल्ह्यातील साजिवा येथे आणि थौबल जिल्ह्यातील यैथिबी लौकोल येथे तात्पुरत्या घरांचे बांधकाम पूर्ण होत आले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी दिली.मदत शिबिरांमधील कुटुंबांना लवकरच या घरांमध्ये हलवले जाईल, अशी माहिती त्यांनी ट्वीट करून दिली.