बंडखोरांची साथ सोडून मुख्य प्रवाहात आल्यानंतरही कोणत्याही प्रकारची नुकसानभरपाई न मिळाल्याबाबत संतप्त झालेल्या शेकडो माजी बाल सैनिकांनी शुक्रवारी येथील माओवादी पक्षाच्या मुख्यालयासमोर उग्र निदर्शने केली. आपल्याला तातडीने योग्य मोबदला दिला नाही तर हिंसक आंदोलन करण्यासही मागे-पुढे पाहणार नाही, असा इशाराही या बाल सैनिकांनी दिल्यामुळे काठमांडूत तणावाचे वातावरण पसरले आहे.
सन २००६ साली दहा वर्षांचा विद्रोह संपवून राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आल्यानंतर माओवादी पक्षाने आपल्याला दूर केल्याचा आरोप करीत हे अल्पवयीन सैनिकांनी पक्षाच्या मुख्यालयासमोरील मोकळ्या जागेवर कब्जा केला आहे. हे बाल सैनिक येथे आठवडय़ाभरापासून माओ पक्ष आणि सरकारविरोधात निदर्शने करीत आहेत. देशातील यादवी युद्धात सुमारे चार हजार मुलांनी माओवादी लष्कराच्या सोबत लढाईत भाग घेतला होता.  
मात्र यादवी युद्ध संपल्यानंतर पुनर्वसनाच्या प्रक्रियेत अल्पवयीन असल्याचे कारण देत त्यांना रोख रक्कम आणि प्रशिक्षण देण्यास विरोध करण्यात आला होता. त्यामुळे हे बाल सैनिक आता बंडाच्या पवित्र्यात असून जोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही, तोपर्यंत आपण आंदोलन मागे घेणार नाही, असे या बाल सैनिकांच्या गटाचे प्रमुख सागर लिंबू यांनी सांगितले.