एका किशोरवयीन मुलाच्या हत्येनंतर फ्रान्समध्ये हिंसाचार सुरू झाला आहे. सलग तीन दिवस फ्रान्सची राजधानी पॅरीस धगघगतंय. देशाच्या विविध भागांमधून जाळपोळ आणि दगडफेकीच्या बातम्या समोर येत आहेत. प्रामुख्याने पोलिसांवर हल्ले होत आहेत. पोलिसांना जनतेच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी पोलीस आणि सुरक्षा दलांवर हल्ले झाल्याची प्रकरणं आतापर्यंत समोर आली आहेत. देशात आतापर्यंत शेकडो गाड्यांची जाळपोळ करण्यात आली आहे.
दरम्यान, याप्रकरणी पोलिसांकडून हिंसाचाराच्या तिसऱ्या दिवसअखेर तब्बल ४०० जणांना अटक करण्यात आली आहे. या हिंसाचारात आतापर्यंत २०० हून अधिक पोलीस आणि सुरक्षा कर्मचारी जखमी झाले आहेत.
या हिंसाचाराला मंगळवारपासून (२७ जून) सुरुवात झाली आहे. फ्रान्सची राजधानी पॅरिसचं उपनगर असलेल्या नॅनटेरेमध्ये एका किशोरवयीन मुलाची पोलिसांनी हत्या केल्याचा आरोप आहे. वाहतूक नियम मोडल्याबद्दल एका पोलिसाने त्याच्यावर गोळ्या झाडल्या. पॉइंट ब्लँक रेंजमधून या अल्पवयीन मुलाच्या छातीत गोळी लागली होती. त्यात त्याचा मृत्यू झाला.
पोलिसानी सांगितलं की, या मुलाने गाडी पोलिसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे पोलिसांनी गोळीबार केला. मात्र, या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलीस खोटं बोलत असल्याचं स्पष्ट झालं आहे. यामुळे लोक संतप्त झाले आणि थेट रस्त्यावर उतरले.
नेमकं काय घडलं होतं?
या घटनेमुळे नागरिक संतापले आहेत. त्यामुळे संतप्त लोकांनी दगडफेक आणि जाळपोळ सुरू केली. अनेक वाहनं आतापर्यंत जाळण्यात आली आहेत. नॅनटेरे शहरात आंदोलकांनी फटाक्यांचा वापर करून अनेक ठिकाणी जाळपोळ केली आहे. बसेसही जाळल्या आहेत. दक्षिण फ्रान्सच्या तोलाउस शहरात पोलीस आणि आंदोलक भिडल्याचं पाहायला मिळालं. तिथे पोलिसांनी ५० च्या वर लोकांना अटक केली आहे. या हिंसाचारात आतापर्यंत २०० हून अधिक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.
दरम्यान, पोलिसांनी या किशोरवयीन मुलाची हत्या केल्याने पोलीस प्रशासनाचा निषेध नोंदवला जात आहे. फ्रान्समधल्या अनेक सेलिब्रिटींनी या घटनेवर शोक व्यक्त केलं. तसेच सरकारनेही संरक्षण दलाला खडे बोल सुनावले आहेत. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन म्हणाले की, त्या किशोरवयीन मुलाची झालेली हत्या ही निंदनीय आणि अक्षम्य बाब आहे. हे हत्याकांड कोणत्याही प्रकारे समर्थनीय ठरू शकत नाही.
हे ही वाचा >> केंद्र सरकारच्या आदेशाविरोधातील ट्विटरची याचिका कर्नाटक हायकोर्टानं फेटाळली; वर ५० लाखांचा दंड
फ्रान्समधील या घटनेमुळे पोलिसांसाठीच्या नियमांमध्ये सुधारणा करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. विशेषत: जातीय/धार्मिक अल्पसंख्यांकांशी व्यवहार करताना पोलिसांच्या वर्तनावर टीका होऊ लागली आहे. गेल्या वर्षी फ्रान्समध्ये पोलिसांच्या कारवाईत १३ जणांचा मृत्यू झाला होता.