पॅरिस : येथील नॉन्ते या उपनगरात नाएल या १७ वर्षीय मुलाच्या पोलिसाच्या गोळीबारात झालेल्या मृत्यूनंतर उसळलेल्या हिंसाचार आणि अशांत वातावरणाची सलग पाचवी रात्र फ्रान्सने अनुभवली. तरुण दंगलखोरांची रविवारी पहाटे पोलिसांशी झटापट झाली. हल्लेखोरांनी महापौरांच्या निवासाला लक्ष्य केले. या हल्ल्यात त्यांचे कुटुंबीय जखमी झाले. तसेच पेटती मोटार निवासस्थानी धडकवण्यात आली. मात्र, हिंसाचाराचे प्रमाण तुलनेने थोडे कमी झाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांनी रविवारी सकाळपर्यंत ७१९ जणांना अटक केली होती. फ्रान्समध्ये गेल्या काही वर्षांतील सर्वात मोठा हिंसाचार रोखण्यासाठी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला.

फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या नेतृत्वासमोर या हिंसाचारामुळे मोठे आव्हान उभे राहिले आहे. या हिंसाचारानिमित्त फ्रान्समधील सामजिक भेदभाव आणि संधीच्या अभावामुळे कमी उत्पन्न असलेल्या घटकांमध्ये खदखदत असलेल्या असंतोषाचा भडका झाल्याचे दिसत आहे. पोलिसांच्या गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या नाएलवर शनिवारी नॉन्ते येथे मुस्लीम धार्मिक पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. शनिवारी रात्री नाएलच्या मृत्यूचा आणि पोलिसांच्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी चॅम्प्स-एलिसीजवर एक छोटासा जमाव जमला, परंतु त्यांना शेकडो सज्ज अधिकाऱ्यांना सामोरे जावे लागले.   आंदोलकांनी पॅरिसच्या परिसरात फटाके फोडले आणि उभारलेले अडथळे पेटवले. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल अश्रूधुर आणि ‘स्टन ग्रेनेड’ने जमावाला पांगवले.

पॅरिसच्या उपनगरातील महापौरांच्या घरावर जळत्या मोटार हल्लेखोरांन धडकवली. गेल्या काही दिवसांत अनेक शाळा, पोलीस ठाणी, सभागृहे आणि दुकानांना लक्ष्य करण्यात आले.

महापौरांच्या हत्येचा प्रयत्न

प्रादेशिक तपासाधिकारी स्टीफन हाडर्ौइन यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, फ्रेंच वाहिनीला त्यांनी सांगितले, की हा हत्येचा प्रयत्न होता. प्राथमिक तपासानुसार पेटती मोटार महापौर निवासाला धडकवून त्याला आग लावण्याचा हल्लेखोरांचा हेतू होता. कारण मोटारीत एका बाटलीत ज्वालाग्राही पदार्थ सापडले. सुरक्षेचा आढावा : पंतप्रधान एलिझाबेथ बोर्न हे गृहमंत्री गेराल्ड डरमानिन व इतर अधिकाऱ्यांसह महापौर जीनब्रून यांना भेटण्यासाठी गेले. आम्ही शक्य तितक्या लवकर सुव्यवस्था आणण्यासाठी सर्व काही करू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिली. मॅक्रॉन यांनी रविवारी संध्याकाळी पंतप्रधान, गृहमंत्री, आणि विधि मंत्र्यासह विशेष सुरक्षा आढावा बैठक घेणार आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Violent protests erupt in france for fifth consecutive night zws