Dubai’s Viral Kunafa Chocolate : पिस्त्यापासून बनवलेले कुनाफा चॉकलेट सध्या जगभर चर्चेत आहे. समाजमाध्यमांवर या कुनाफा चॉकलेटची बरीच चर्चा आहे. या चॉकलेटचे व्हिडीओ, फोटो व जाहिराती इतक्या व्हायरल झाल्या आहेत की सगळीकडे या चॉकलेटची मागणी वाढली आहे. मात्र, या उत्पादनाच्या लोकप्रियतेमुळे एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. पिस्त्यापासून बनवल्या जाणाऱ्या या चॉकलेटमुळे जगभर पिस्त्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. हे कुनाफा चॉकलेट बनवण्यासाठी पिस्त्याची प्रचंड मागणी आहे.
मागणी अधिक आणि पुरवठा कमी असल्यामुळे बाजारात पिस्त्याचा तुटवडा निर्माण झाल्याचं वृत्त फायनान्शियल टाइम्सने प्रसिद्ध केलं आहे. तसेच या चॉकलेटमध्ये काजू देखील वापरले जातात. त्यामुळे काजूच्या किंमती वाढल्या आहेत.
जगभरातून मागणी
हे कुनाफा चॉकलेट बुटिक एमिराती चॉकलेटियरने २०२१ मध्ये सर्वप्रथम लाँच केलं होतं. सुरुवातीला मध्य-पूर्व आशियात या चॉकलेटला काही प्रमाणात लोकप्रियता मिळाली होती. मात्र, हे चॉकलेट दुबई व आसपासच्या भागात स्थानिक उत्पादन म्हणून मर्यादित राहिलं. मात्र, आता जगभर या चॉकलेटची मागणी वाढली आहे.
एका टिकटॉक व्हिडीओमुळे हे चॉकलेट जगभर पोहोचलं. डिसेंबर २०२३ मध्ये एका टिकटॉक इन्फ्लुएन्सरने या चॉकलेटचा व्हिडीओ शेअर केला होता ज्याला आता १२० मिलियन्सहून (१२ कोटी) अधिक व्ह्यूव्ज मिळाले आहेत. फायनान्शियल टाइम्सने यासंबंधीचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
पिस्त्याचा तुटवडा, तर काजूच्या किंमतीत वाढ
या चॉकलेटचा आस्वाद घेण्यासाठी प्रत्येकजण दुबईला जाऊ शकत नसल्यामुळे जगभरातील चॉकलेट कंपन्यांनी दुबईतून हे चॉकलेट मागवण्यास सुरुवात केली आहे. जगभरातून या चॉकलेटला प्रचंड मागणी आहे. या चॉकलेटच्या मागणीत वाढ झाल्यामुळे पिस्त्याची किंमत वाढली आहे. एक पाउंड पिस्ता (Pistachio kernels – कवच काढून विकला जाणारा पिस्ता) गेल्यावर्षी ७.६५ डॉलर्स (८७८ रुपये) इतक्या किंमतीत विकला जात होता. त्याची किंमत आता १०.३० डॉलर्स (१,१६५ रुपये) प्रति पाउंड इतकी झाली आहे. दुसऱ्या बाजूला पिस्त्यापासून बनवलेल्या १४५ ग्रॅमच्या कुनाफा चॉकलेट बारची किंमत १० पाउंड (११३५ रुपये) इतकी आहे.
पिस्त्याच्या तुटवड्याचं कारण काय?
दुबईतील कुनाफा चॉकलेटमुळे पिस्त्याच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर पिस्त्याचा तुटवडा निर्माण झाला आहे आणि काजूच्या किंमती वाढल्याचा दावा केला जात आहे. हे वृत्त काही अंशी खरं असलं तरी पिस्त्याचा तुटवडा निर्माण होण्यास व काजूच्या किंमती वधारण्यास इतरही काही कारणे आहेत. जसे की जागतिक पुरवठा साखळी, कोकोच्या किंमती आणि व्यापारातील अडथळ्यांमुळे हा परिणाम झाला आहे. भारतातही काजू व पिस्त्याच्या किंमती वाढल्या आहेत. पिस्ता व काजूच्या किंमतीवरील हा परिणाम पुढील काही दिवस असाच कायम राहण्याची शक्यता आहे.