सामान्य नागरिक आपल्या समस्या विविध माध्यमातून सरकार दरबारी पोहोचवत असतो. सरकारकडून या समस्या कधी सोडवल्या जातात तर कधी दुर्लक्ष केल्या जातात. आता तर, सोशल मीडियासारखे अस्त्र सामान्यांच्या हाती आल्याने एक ट्विट केल्यास संबंधित यंत्रणेपर्यंत आपली समस्या पोहोचू शकतो. असाच एक प्रयोग केलाय एका जम्मूमधील एका शाळकरी मुलीनं. तिने आपल्या शाळेची झालेली पडझड एका व्हिडीओच्या माध्यमातून शूट केली आणि थेट मोदींनाच विनंती केली. “आम्हाला चांगली शाळा बांधून द्या. येथे बसून आमचे कपडे खराब होतात, त्यामुळे आई ओरडते”, अशी विनंती या मुलीने व्हिडीओच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून जवळपास २ मिलिअन्सपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या व्हिडीओमधील शाळकरी मुलगी जम्मूच्या कठुआ येथील लोहिया मल्हार गावातील आहे. तिचं नाव आहे सीरत नाज. तिच्या शाळेची अक्षरशः पडझड झाली आहे. बसायला बेंच नाहीत. त्यामुळे रेती असलेल्या जमिनीवर बसून अभ्यास करावा लागतो. यामुळे गणवेश खराब होतो, अशी तक्रार तिने व्हिडीओच्या माध्यमातून केली आहे. तसंच, जर्जर झालेल्या संपूर्ण शाळेची सफरच या व्हिडीओच्या माध्यमातून घडवली आहे.

चिमुकलीची पंतप्रधानांकडे विनंती

व्हिडीओमध्ये मुलगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना म्हणते की, ‘कसे आहात तुम्ही, बरे आहात का? माझं नाव सीरत नाज आहे. मी लोहिया बाजारात राहते. मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. मी गर्व्हमेंट हायस्कूल, लोहियामध्ये शिकते. तुम्ही सर्वांचं ऐकता. मग माझंही ऐका, असं म्हणत शाळकरी मुलगी तिच्या व्हिडीओच्या माध्यमातून पडझड झालेल्या शाळेची सफर घडवते.

‘ही माझी शाळा आहे, असं म्हणत ती त्यांच्या शाळेचा बंद असलेला स्टाफ रुम आणि मुख्यध्यापकांची खोली दाखवते. तसंच, खड्डे पडलेल्या जमिनीवर बसून आम्हाला अभ्यास करावा लागतो. कृपया आमच्यासाठी एक चांगली शाळा बनवा ना’, अशी विनंतीही ती या व्हिडीओच्या माध्यमातून करते.

तसंच, शाळेच्याच बाजूला असलेली एक निर्माणाधीन इमारत ती दाखवते. गेल्या पाच वर्षांपासून ही शाळेची इमारत बनत असल्याचं ती म्हणते. ‘या निर्माणाधीन इमारतीतच मुलं अभ्यास करतात. माझी आपल्याला विनंती आहे की एक चांगली शाळा बनवून द्या. या खराब फरशीमुळे आमचा गणवेश खराब होतो. त्यामुळे आम्हाला आई मारते,’ असं म्हणत ती शाळेचा वरचा मजलाही दाखवते. वरच्या मजल्यावरही वर्गखोल्यांची दयनीय अवस्था झाल्याचं व्हिडीओच्या माध्यमातून दिसत आहे.

या संपूर्ण व्हिडीओच्या माध्यमातून ती जवळपास तीन ते चारवेळा “प्लिज मोदीजी एक अच्छा सा स्कुल बनवा दो ना”, अशी विनंती करते. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून लोकांनीही या चिमुकलीच्या शाळेबाबत दुःख व्यक्त केलं आहे. त्यामुळे मोदींनी लवकरात लवकर अशा पडझड झालेल्या शाळांची पूनर्बांधणी करावी, अशी मागणी नेटिझन्सने केली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video modiji you listen to entire nation girls request sgk