चेहऱ्यावर तिरंगा रंगवल्याने एका तरुणीला पंजाबच्या अमृतसर येथे असलेल्या सुवर्ण मंदिरात (Golden Temple) प्रवेश नाकारण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून गोल्डन टेम्पल प्रशासनाला नेटिझनन्सने धारेवर धरलं आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दोघेजण गुरुद्वारात प्रवेशद्वारावर एका व्यक्तीशी वाद घालताना दिसत आहेत. महिलेला गुरूद्वारात प्रवेश का दिला जात नाहीय, असा प्रश्न विचारताच गुरुद्वारच्या कार्यकर्त्याने धक्कादायक उत्तर दिलं आहे. “तरुणीच्या चेहऱ्यावर तिरंगा रंगवलेला आहे, त्यामुळे तिला प्रवेश दिला जाणार नाही,” असं त्याने म्हटलं. हा झेंडा भारताचा आहे, असं तरुणीने सांगितल्यानंतर हा पंजाब आहे, भारत नाही! अशी धक्कादायक प्रतिक्रिया त्याने दिली.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसिद्ध होताच तुफान व्हायरल झाला आहे. अनेक सोशल मीडिया पेजवरूनही हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. देशभरातील नेटिझन्सकडून गुरुद्वारच्या प्रशासनावर टीका झाल्यानंतर प्रशासनाने त्यावर उत्तर दिलं आहे.
“हे गुरुद्वार आहे. प्रत्येक धर्माचं स्वतःचे नियम असतात. आम्ही प्रत्येकाचं स्वागत करतो. आम्ही या गैरवर्तुवणुकीबद्दल क्षमा मागतो. तिच्या चेहऱ्यावर रंगवलेला तिरंगा आपल्या भारताचा नव्हता. कारण त्यावर अशोक चक्र नव्हतं. हा कोणत्यातरी पक्षाचा झेंडा होता”, अशी प्रतिक्रिया गुरुद्वार प्रशासनाचे सचिव गुरुचरण सिंग ग्रेवाल यांनी दिली.