Chandrayaan-2 Moon Landing : श्रीहरिकोटाच्या प्रक्षेपण केंद्रावरून २२ जुलै रोजी झेपावलेले “चांद्रयान-२” अनेक महत्त्वाचे टप्पे पार पाडत चंद्राजवळ पोहोचले. मात्र, काही तांत्रिक कारणामुळे विक्रम लँडरचा संपर्क तुटला. त्यामुळे भारतीयांचा थोडासा हिरमोड झाला. पण ISRO च्या प्रयोगाचे आणि प्रयत्नांचे साऱ्यांनी तोंडभरून कौतुक केले. माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर यांच्यापाठोपाठ भारताचा कर्णधार विराट कोहली यानेही ISRO च्या कामगिरीचे कौतुक केले आणि भारतीय शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांना सलाम केला.
“विज्ञानात अपयश वगैरे काहीही नसते. जेवढे अधिक प्रयोग केले जातात, तेवढे नवे आणि ज्ञानात भर पाडणारे अनुभवच मिळतात. ISRO च्या शास्त्रज्ञांनी दिवसाची रात्र करून अविरत प्रयत्न केले. त्यांच्याबद्दल मनात नितांत आदर आहे. संपूर्ण देशाला तुमच्यावर गर्व आहे. जय हिंद!”, अशा शब्दात विराटने चांद्रयान – २ मोहिमेची स्तुती केली.
There’s nothing like failure in science, we experiment & we gain. Massive respect for the scientists at #ISRO who worked relentlessly over days & nights. The nation is proud of you, Jai Hind! #Chandrayan2
— Virat Kohli (@imVkohli) September 7, 2019
या आधी “स्वप्न जरी अपूर्ण राहिलं असेल तरी आपण खचून जायचं नाही. आपल्यातील आशावाद कायम जिवंत ठेवला पाहिजे. आपण नक्कीच यशस्वी होऊ”, असे ट्विट करत सेहवागनेही ISRO च्या कामगिरीचे कौतुक केले आहे. तसेच भाजपा खासदार गौतम गंभीरनेही ISRO दमदार पुनरागमन करेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
दरम्यान, या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी संपूर्ण देश क्षणांक्षणांचं अपडेट पाहत होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह संपूर्ण देशाने रात्रभर जागून अनुभव घेतला. मात्र, विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागापासून २.१ किलोमीटपर्यंत पोहोचले असताना संपर्क तुटला. विक्रम लँडरशी संपर्क तुटल्यानंतर शास्त्रज्ञांबरोबरच संपूर्ण देशाचा श्वास रोखला गेला. यावेळी उपस्थित असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शास्त्रज्ञांना धीर दिला.