काश्मीरच्या प्रश्नावर संयुक्त राष्ट्राकडे हस्तक्षेप करण्याची मागणी करणारा पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीला भारताचा कर्णधार विराट कोहलीसह अन्य क्रिकेटपटूंनी खडेबोल सुनावले आहेत. भारतीय लष्कराने धडक कारवाई करुन काश्मीरमध्ये दहा दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्यानंतर आफ्रिदीने टि्वट करुन काश्मीरमधल्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. त्याला लगेचच गौतम गंभीरने टि्वट करुन उत्तर दिले होते. आता कर्णधार विराट कोहलीनेही आफ्रिदीला चपराक लगावली आहे.

जी कुठली गोष्ट भारताच्या हिताला बाधा पोहोचवेल त्याचे मी कधीच समर्थन करणार नाही. एक भारतीय म्हणून देशाच्या हितालाच तुमचे पहिले प्राधान्य असेल. मी सुद्धा देशाच्याच भल्याचा विचार करतो. कोणी त्या विरोधात असेल तर मी कधीच समर्थन करणार नाही. एखाद्या विषयावर मत प्रदर्शन करणे हा प्रत्येकाचा व्यक्तिगत निर्णय आहे. एखाद्या विषयाचे पूर्ण ज्ञान असल्याशिवाय त्यावर बोलणे मला योग्य वाटत नाही. पण तुमचे पहिले प्राधान्य देशालाच असले पाहिजे असे कोहली म्हणाला.

नेमका काय आहे वाद
जम्मू काश्मीरमध्ये रविवारी लष्कराने दहशतवादविरोधी अभियानाअंतर्गत १३ दहशतवाद्यांचा खात्मा केल्याने एकीकडे पाकिस्तानी सरकारने दुःख व्यक्त केलं असताना पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शाहीद आफ्रिदीनेही ट्विट करून दहशतवाद्यांसाठी सहानुभूती व्यक्त केली होती.

भारत व्याप्त काश्मीरमध्ये चिंताजनक परिस्थिती आहे. तिथे निरपराधांची गोळया झाडून हत्या केली जात आहे. संयुक्त राष्ट्र, अन्य संस्था कुठे आहेत. हा रक्तपात थांबवण्यासाठी ते काहीच का करत नाहीत असे टि्वट आफ्रिदीने केले होते.

त्याला उत्तर देताना गंभीरने ‘प्रसारमाध्यमांनी शाहीद आफ्रिदीच्या ट्विटवर प्रतिक्रिया घेण्यासाठी मला फोन केले. त्यात काय प्रतिक्रिया द्यायची? शाहीद आफ्रिदी फक्त UN कडे पाहत आहे, कारण त्याच्या डिक्शनरीत त्याचा अर्थ “UNDER NINTEEN” असा आहे. मीडियाने शांतपणे घ्यावं. आफ्रिदी नो बॉलवरील विकेट साजरा करत आहे’.असं खोचक ट्विट केलं.

Story img Loader