पाटणा येथील ‘इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स’ (आयजीआयएमएस) रुग्णालयाकडून काढण्यात आलेल्या वादग्रस्त आदेशासंदर्भात बिहारचे आरोग्यमंत्री मंगल पांडे यांनी गुरूवारी स्पष्टीकरण द्यावे लागले. ‘आयजीआयएमएस’ने कर्मचाऱ्यांची वैवाहिक माहिती जाणून घेण्यासाठी त्यांना एक अर्ज भरायला दिला होता. या अर्जात ‘वैवाहिक जीवनाची माहिती’ या शीर्षकाखालील रकान्यात चक्क व्हर्जिन आहात की नाही, याची माहिती द्यायला सांगितले होते. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर मंगल पांडे यांनी आज प्रसारमाध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली. अर्जातील व्हर्जिन या शब्दाचा अर्थ अविवाहित मुलगी असा होतो. त्यामुळे यामध्ये काही आक्षेपार्ह आहे, असे मला वाटत नाही. मात्र, तरीही यावरून वाद निर्माण केला जात आहे. मी ‘आयजीआयएमएस’च्या अधिकाऱ्यांशी यासंदर्भात बोललो आहे. तेव्हा त्यांनी सांगितले की, AIIMS रूग्णालयातील अर्जाच्या धर्तीवरच आमचा अर्ज तयार करण्यात आला आहे. देशातील बहुतांश वैद्यकीय संस्थांमधील अर्ज असेच असतात, असे रूग्णालयाकडून सांगण्यात आल्याचे पांडे यांनी म्हटले.
‘माझे लग्न झाले असून, माझी एकच जिवंत पत्नी आहे; माझे लग्न झाले असून, एका पेक्षा जास्त पत्नी आहे; माझे लग्न झाले असून, माझ्या पतीची दुसरी पत्नी नाही; माझे लग्न झाले असून, माझ्या पतीची एक पत्नी आहे’ असे पर्यायही या अर्जात देण्यात आलेत. हा प्रकार बघून कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती.
मात्र, ‘आयजीआयएमएस’चे वैद्यकीय महासंचालक मनिष मंडल यांनीही हा अर्ज केंद्रीय नागरी सेवेच्या नियमांप्रमाणे असल्याचे म्हटले. अर्जातील व्हर्जिन या शब्दाचा कर्मचाऱ्यांच्या कौमार्याशी नव्हे तर वैवाहिक स्थितीशी संबंध आहे. एखाद्याचा अचानकपणे मृत्यू झाल्यास त्याचा वारसदार कोण असेल? हे जाणून घेण्यासाठी सरकारनेच हे नियम बनवले आहेत. त्यामुळे त्यांनी हे शब्द बदलायला सांगितले तर आम्ही बदलू, असे मनिष मंडल यांनी स्पष्ट केले.