साथरोगतज्ज्ञ शाहिद जामील यांनी केंद्र सरकारने स्थापन केलेल्या सार्स-कोव्ही-२ जीनोमीत कॉनसर्टीयाच्या (आयएसएसीओजी) प्रमुख पदावरुन राजीनामा दिलाय. भारतामधील करोना विषाणूंच्या जीनोम सिक्वेन्सिंग म्हणजेच रचनेसंदर्भात सरकारला सल्ला देण्यासाठी काही वैज्ञानिकांचा समावेश असणारा हा गट स्थापन करण्यात आला होता. जामील हे या गटाचे प्रमुख होते. मात्र मध्यरात्रीच्या सुमारस त्यांनी हे पद सोडत असल्याचं जाहीर केलं. जामील यांनी अशाप्रकार तडकाफडकी राजीनामा देणं हा सरकारसाठी मोठा झटका असल्याचं मानलं जात आहे. अनेक विषयांवरुन जामील यांची मत ही सरकारच्या सध्याच्या धोरणांपेक्षा वेगळी होती तसेच ते या गटाचे प्रमुख असेल तरी सरकारच्या धोरणांवर सडेतोड शब्दांमध्ये टीका करत असल्याचं मागील काही काळापासून दिसून येत होतं.
नक्की वाचा >> मोदींच्या लोकप्रियतेलाही बसला करोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका; पहिल्यांदाच ग्राफ ५० टक्क्यांच्या खाली
देशामध्ये करोना विषाणूचे अनेक प्रकार आढळून आल्यानंतर जानेवारीमध्ये आयएसएसीओजीची स्थापना करण्यात आलेली. विषाणूमध्ये होणारा बदल आणि त्यासंदर्भातील सल्ला केंद्राला देण्यासाठी वैज्ञानिकांच्या या गटाची स्थापना करण्यात आली होती. यामध्ये देशभरातील वेगवेगळ्या भागातून विषाणूंची रचना समजून घेण्यासाठी सॅम्पल गोळा करुन दहा प्रयोगशाळांमध्ये त्यांच्यावर अभ्यास केला जायचा. जानेवारीत हा गट स्थापन करण्यात आला तेव्हा त्याला सहा महिन्यांची मुदत देण्यात आलेली जी नंतर वाढवण्यात आली. भारतामधील जिनोम रचना अभ्यास आणि संशोधनाच्या कामाने आयएसएसीओजीच्या स्थापनेनंतर बरीच गती पकडली होती.
Senior virologist Shahid Jameel resigns as the chairman of scientific advisory group of Indian SARS-CoV-2 Genome Sequencing Consortia (INSACOG), a forum set up by the Centre last year for laboratory and epidemiological surveillance of circulating strains of COVID-19 in India
— ANI (@ANI) May 16, 2021
जामील हे प्रसिद्ध शास्त्रज्ञ असून ते या करोनाच्या साथीसंदर्भात मुक्तपणे आपली मतं मांडत असतात. द इंडियन एक्सप्रेससाठीही जामील यांनी काही लेख लिहिले आहेत. मागील आठवड्यामध्येच ते वृत्तपत्राने आयोजित केलेल्या एक्सप्लेन्ड या कार्यक्रमाला उपल्थित होते. वैज्ञानिक विषयांवर बोलण्यामध्ये जामील यांचा हातखंड आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव रोखण्यात, कमी करण्यात केंद्र सरकार कमी पडल्याची टीका जामील यांनी अनेकदा केलीय.
जामील यांनी नुकतेच इंडियन एक्सप्रेसशी बोलताना “सरकारी यंत्रणांना करोना जानेवारीमध्ये संपला आहे असं वाटलं आणि त्या बेजबाबदार झाल्या. त्यामुळेच त्यांनी तात्पुरत्या स्वरुपात महिनाभरापूर्वी उभारलेल्या अनेक आरोग्य सुविधा देणारी केंद्र बंद केली,” असं ते म्हणाले.
नुकताच त्यांनी ‘न्यू यॉर्क टाइम्स’साठी लेख लिहिला होता. ज्यामध्ये त्यांनी चाचण्यांची संख्या वाढवणे आणि लोकांना आयसोलेट करण्याचं प्रमाण वाढवण्याची शिफारस केली होती. तसेच देशामध्ये तात्पुरत्या स्वरुपात अधिक बेड्स आणि इतर सुविधा निर्माण करण्याची गरज असल्याचंही त्यांनी या लेखात म्हटलं होतं. निवृत्त डॉक्टर आणि नर्सची मदत घेतली पाहिजे, पुरवठा साखळी मजबूत करुन औषधं आणि ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत केला पाहिजे, असे सल्लेही जामीलयांनी दिले होते. “भारतात या अशा उपाययोजना केल्या पाहिजेत असं माझ्या सहकाऱ्यांचही मत आहे. मात्र या उपाययोजनांना पुराव्यावर आधारित धोरणं तयार करणाऱ्या यंत्रणांकडून विरोध केला जातोय. आकडेवारीवर आधारित निर्णय घेणे हा आणखीन एक गोंधळ देशात आहे. देशामधील करोनाची परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेलीय. माणसांच्या रुपाने आपण जे काही गमावतोय त्यामुळे या साथीचे व्रण कायमचे राहणार आहेत,” असा युक्तीवाद जामील यांनी केला होता.
नक्की वाचा >> मोदींचं कौतुक करणाऱ्या The Daily Guardian वेबसाईटची नोंदणी उत्तर प्रदेशमधील; सर्वसामान्यांनीच केली पोलखोल
मात्र त्याचवेळी जामीलहे सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या निर्णयाचाही विरोध करत होते. ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना करण्याचा निर्णय त्यांना पटला नव्हता. “हे खरोखरच दुर्देवी आहे. आपल्याकडे आधीच डॉक्टर्सची कमतरता आहे. त्यात आपण आपले सर्वात चांगल्या डॉक्टरांना तुम्ही ऑक्सिजन-ऑक्सिजन खेळा असं सांगितलं आहे. तुम्ही ठरवा कोणाला ऑक्सिजन दिला पाहिजे. हे खरोखर आमच्यासाठी दुख:द दिवस आहे. हे डॉक्टर्स त्याच्या औषधांसाठी आणि उपचारांसाठी प्रसिद्ध आहे. मात्र ऑक्सिजन आणि त्याचा पुरवठा आणि आकडेवारीसंदर्भात त्यांना काय माहितीय?,” असा प्रश्न जामील यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना उपस्थित केलेला.