पाकिस्तानने भारतीय अर्जदारांकडून अनेक कागदपत्रांच्या केलेल्या मागणीनंतर वाघा सीमेरेषेवर ६५ वर्षांवरील नागरिकांना भारतात येण्यासाठीच्या व्हिसा प्रक्रियेस स्थगिती देण्यात आली असल्याचे राजकीय सूत्रांनी म्हटले आहे.
६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना भारतात येणे सोयीचे व्हावे, यासाठी भारताने पाकिस्तानी नागरिकांना राष्ट्रीय ओळखपत्र व रहिवासी असल्याचा दाखला एवढीच कागदपत्रे व्हिसा प्राप्त करण्यासाठी सादर करणे बंधनकारक केले आहे. मात्र भारतातील ज्येष्ठ नागरिकांकडे पाकिस्तानात जाण्यासाठी अनेक कागदपत्रांची मागणी पाकिस्तान सरकारकडून करण्यात येत आहे. पाकिस्तानातील एका प्रायोजकाचे नावही देणे भारतीय नागरिकांसाठी बंधनकारक करण्यात आले आहे. उभय देशांच्या अधिकाऱ्यांनी व्हिसा प्रक्रियेसाठीच्या अटी सामंजस्याने ठरविल्यानंतरही पाकिस्तानच्या अतिरिक्त कागदपत्रांची मागणी करण्याच्या निर्णयामुळे भारताकडून या प्रक्रियेस स्थगिती देण्यात आली आहे.
भारताकडून याबाबतच्या नियमांत बदल करण्यात येत असून पाकिस्तान ज्या कागदपत्रांची मागणी भारतीय नागरिकांकडून करेल तशीच कागदपत्रे पाकिस्तानी नागरिकांनाही यापुढे सादर करावी लागतील, असे सूत्रांनी म्हटले आहे.
सीमेपलीकडे सुलभ रीतीने प्रवास करता यावा यासाठी गेल्या सप्टेंबर महिन्यात भारत आणि पाकिस्तानामध्ये नव्या व्हिसा करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. त्यानुसार ही व्हिसा प्रक्रिया १५ जानेवारीपासून सुरू होणार होती. भारत-पाकिस्तान दरम्यान प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर असलेल्या तणावपूर्ण स्थितीमुळे या प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली असल्याचेही बोलले जात आहे. भारतीय अधिकाऱ्यांनी व्हिसा प्रकिया नव्याने सुरू करण्याची तारीख अद्याप जाहीर केलेली नसल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले आहे.