Vishnu Gupta Attack : हिंदू सेना या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू गुप्ता यांच्यावर शनिवारी सकाळी गोळीबार झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. राजस्थानच्या अजमेर शहरात ही घटना घडली आहे. या हल्ल्यात गुप्ता बचावले आहेत. एकही गोळी त्यांना लागली नाही, या गोळीबारात ते थोडक्यात बचावले आहेत. गुप्ता अजमेरवरून दिल्लीला जात असताना त्यांच्यावर हा हल्ला झाला. अजमेरमधील गेगल पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. गुप्ता यांनी म्हटलं आहे की त्यांच्या कारवर हा हल्ला झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक वंदिता राणा व इतर अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. गुप्ता यांच्या कारवर बंदुकीच्या गोळ्यांचे निशाण दिसत आहेत. पोलीस आता हल्लेखोरांचा तपास करत आहेत.
विष्णू गुप्ता यांनी अलीकडेच दावा केला आहे की अजमेर दर्गा हा शिव मंदिर पाडून बांधलेला आहे. या दर्ग्याच्या खाली मंदिराचे अवशेष आहेत. त्यामुळे वातावरण तापलं आहे. याप्रकरणी त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. अजमेर जिल्हा सत्र न्यायालयात शुक्रवारी (२४ जानेवारी) याप्रकरणी सुनावणी झाली. तसेच त्यांनी त्यांच्या सुरक्षेसंबंधीची याचिका देखील दाखल केली आहे. गुप्ता यांना वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. त्यांना व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याने त्यांनी न्यायालयाचं दार ठोठावलं आहे. अशातच आज त्यांच्यावर गोळीबर झाला आहे.
विष्णू गुप्तांची पहिली प्रतिक्रिया
विष्णू गुप्ता म्हणाले, “न्यायालयात सुनावणी चालू असताना आसपासच्या परिसरात मोठी गर्दी जमते. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखणं अवघड होतं. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना अधिक बंदोबस्त करावा लागेल. मी पोलिसांना विनंती केली आहे की न्यायालयाच्या बाहेर शांतता राखावी. न्यायालय परिसरात शांततापूर्ण वातावरण राहावं, कायदा व सुव्यवस्था राहावी यासाठी पोलीस प्रशासन विशेष बंदोबस्त करेल अशी अपेक्षा आहे. हे धार्मिक भावनांशी संबंधित प्रकरण असल्याने स्थिती संवेदनशील बनली आहे. आमच्या याचिकेवरील सुनावणीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, अजमेरच्या न्यायालयाने केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (ASI), आणि अजमेर दर्गा समितीला नोटिसा बजावून प्रसिद्ध दर्गा शरीफचे प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्याच्या मागणीसंदर्भात उत्तर मागितले आहे. विष्णू गुप्ता यांनी दावा केला आहे की, १३ व्या शतकातील सूफी संत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांचा मकबरा मूलतः एक शिवमंदिर होते. त्याच पार्श्वभूमीवर गुप्ता काही पुरावे व पुस्तकं सादर केली आहेत.